कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या आणखी चार टोळ्या पोलिसांच्या रडारवर, असा लागला शोध...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 11:38 AM2023-01-19T11:38:29+5:302023-01-19T11:56:10+5:30

पुरोगामी जिल्ह्याचे सामाजिक अपयश

Four more gangs on the police radar in Kolhapur for gender diagnosis | कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या आणखी चार टोळ्या पोलिसांच्या रडारवर, असा लागला शोध...

कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या आणखी चार टोळ्या पोलिसांच्या रडारवर, असा लागला शोध...

Next

कोल्हापूर : अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यात दोन ठिकाणी छापे टाकून अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या चार टोळ्या पोलिसांच्या रडारवर आहेत, तसेच अटकेतील संशयितांची संपत्ती सील करण्याचेही प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी लोकमतला दिली.

जन्माला येणाऱ्या मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण खूपच कमी होत असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी सायलंट ऑब्झर्व्हर संकल्पना राबवण्यात आली. मात्र काही दिवसातच ती यंत्रणा कागदावर राहिली असून, जिल्ह्यात गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळ्या फोफावल्याचे दिसत आहे. या टोळ्यांचा छडा लावण्यासाठी पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाला सूचना दिल्या.

त्यानुसार मंगळवारी (दि. १७) कसबा वाळवे (ता. राधानगरी) आणि मडिलगे खुर्द (ता. भुदरगड) येथे कारवाई करून चौघांना अटक करण्यात आली. दरम्यान, सीमा भागात एका ठिकाणी होणारी कारवाई थोडक्यात टळली असून, त्या कारवाईतून रॅकेटमधील काही म्होरके हाती लागतील, अशी माहिती पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. या गुन्ह्यात आणखी चार मोठ्या टोळ्या कार्यरत असून, त्यांची ठिकाणे, त्यातील व्यक्ती, एजंट, औषध पुरवठादार यांची साखळी निष्पन्न झाल्याचे बलकवडे यांनी सांगितले.

असा लागला शोध...

गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळीचा शोध घेण्यासाठी पोलिस मुख्यालयातील एका महिला कॉन्स्टेबल पेशंट म्हणून पाठवले. तिच्यावर विश्वास ठेवून एजंटने गर्भलिंग निदान करणाऱ्या बोगस डॉक्टरची माहिती दिली. त्यातून दोन टोळ्यांची माहिती पोलिसांच्या हाती लागली.

पुरोगामी जिल्ह्याचे सामाजिक अपयश

स्त्रीभ्रूण हत्यामुळे पुरोगामी म्हणवणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याची प्रतिमा राज्यात मलीन होत आहे. शिक्षण आणि आर्थिक सुबत्ता वाढत असतानाही स्त्रीभ्रूण हत्येची मानसिकता येणाऱ्या काळात नव्या सामाजिक समस्यांना जन्म देणारी ठरू शकते.

पडद्यामागील सूत्रधारांवर नजर

गर्भातच कळ्या खुडण्याचे प्रकार जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरू आहेत. प्रत्यक्ष गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणारे काही मोजकेच संशयित समोर दिसत असले तरी, त्यामागे मोठी यंत्रणा कार्यरत असल्याचा अंदाज पोलिस अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. त्यादृष्टीने सूत्रधारांवर नजर असून, भक्कम पुराव्यांसह त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.

संशयितांची संपत्ती सील करणार

गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या गुन्ह्यात प्रत्यक्ष भ्रूणाचा पुरावा मिळाल्यास संशयिताला दहा वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते. आजवर जिल्ह्यात अनेकदा कारवाया झाल्या, मात्र एकाही गुन्ह्यात संशयितांना शिक्षा झालेली नाही. त्यामुळेच जामिनावर सुटलेले संशयित पुन्हा सक्रिय होतात. सध्या अटकेत असलेल्या संशयितांची संपत्ती सील करण्याचे प्रयत्न अधिकाऱ्यांकडून सुरू आहेत.

स्त्रीभ्रूण हत्येचे आंतरराज्यीय रॅकेट मुळापासून उखडून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनीही मानसिकता बदलून गर्भलिंग निदान करण्याचा अट्टाहास टाळून संशयितांची माहिती पोलिसांना द्यावी. - शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक कोल्हापूर.

Web Title: Four more gangs on the police radar in Kolhapur for gender diagnosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.