कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ; आणखी चार ओमायक्रॉन रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 04:28 PM2022-01-05T16:28:38+5:302022-01-06T11:36:58+5:30
दिवसेंदिवस ओमायक्रॉन रुग्णांच्या या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेबरोबरच नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण बनले आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर शहरवासीयांच्या दृष्टीने बुधवारचा दिवस चिंतेचा ठरला. शहरात गेल्या चोवीस तासांत ओमायक्रॉनचे तीन, तर कोरोनाचे नवीन ५७ रुग्ण आढळून आले. तिसऱ्या लाटेची ही चाहूल असल्याने शहरवासीयांनी आता खबरदारी घेण्याची गरज आहे.
शहरात बुधवारी आणखी तीन ओमायक्रॉनचे रुग्ण सापडल्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या आठ झाली आहे. नागाळापार्क येथे ओमायक्रॉनचा एक ३६ वर्षीय पुरुष रुग्ण आढळून आला असून, ही व्यक्ती कोलकात्याहून आली आहे. हनुमाननगर येथील ७४ वर्षीय पुरुष व्यक्तीला ओमायक्रॉन झाल्याचे स्पष्ट झाले. या वृध्दाचा मुलगा याआधीच ओमायक्रॉन पॉझिटीव्ह आहे. दिवसभरातील तिसरा पुरुष लक्ष्मीपुरीतील असून, त्याची माहिती घेण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते.
बुधवारी आढळून आलेल्या तीनही रुग्णांना सौम्य लक्षणे असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीही चांगली आहे, असे सांगण्यात आले. या व्यक्ती राहत असलेल्या परिसरात आरोग्य विभागामार्फत औषध फवारणी करण्यात आली आहे. ते राहत असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या व्यक्तीच्या नजिकच्या संपर्कातील व्यक्तींमध्ये २१ लोकांचे स्वॅब घेण्यात आले. पाचजणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. बाकीचे अहवाल निगेटिव्ह आले. दुय्यम संपर्कातील व्यक्तींमध्ये २३ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. ते अहवालही निगेटिव्ह आले आहेत. तीन व्यक्तींचे अहवाल पुढील तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.
कोल्हापूर शहर परिसरात बुधवारी एकाच दिवसात कोरोनाचे ५७ रुग्ण आढळून आले. अलीकडील काही दिवसांतील ही सर्वाधिक संख्या आहे. नाकाला मास्क, गर्दीत जाणे टाळणे तसेच सॅनिटायझरचा सतत वापर करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात दोन ओमायक्रॉन रुग्ण
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, महागाव येथील ४६ वर्षीय पुरुष डॉक्टर, तर लोणी काळभोर, पुणे येथील परंतु सध्या गांधीनगर येथे राहणारा ३६ वर्षीय पुरुष बुधवारी ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. महागावची व्यक्ती मुंबईहून आली असून, गांधीनगर येथील व्यक्ती केनियातून आलेली आहे. आतापर्यंत शहरातील आठ, तर ग्रामीण भागातील दोन अशी ओमायक्रॉन रुग्णांची संख्या दहा झाली आहे.