आणखी चार पोलिसांचा सहभाग
By admin | Published: May 8, 2017 12:02 AM2017-05-08T00:02:43+5:302017-05-08T00:02:43+5:30
वारणानगर चोरीप्रकरण : फिर्यादीत नावेच नाहीत, ‘देव’ पावल्याचा साक्षात्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वारणानगर (जि. कोल्हापूर) येथून सव्वानऊ कोटींच्या रकमेवर डल्ला मारल्याच्या प्रकरणात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागातील आणखी चार पोलिसांचा सहभाग असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे; पण या चौघांची फिर्यादीत नावेच आली नसल्याने त्यांना ‘देव’ पावल्याचा साक्षात्कार झाला आहे. या चार पोलिसांविरुद्धही गुन्हा दाखल होणार का? राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभाग त्यादृष्टीने तपास करणार का? याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
मिरजेतील बेथेलहेमनगर येथे गतवर्षी एलसीबीने झोपडीवजा घरातून तीन कोटींची रोकड जप्त करून मैनुद्दीन मुल्ला यास अटक केली होती. चौकशीत ही रक्कम त्याने वारणानगर येथून चोरल्याचे निष्पन्न झाले. एलसीबीने तपासाच्या नावाखाली मैनुद्दीनला वारणानगरला नेले. त्यानंतर तिथे पुन्हा कोट्यवधीचे ‘घबाड’ सापडले. यातील दीड कोटीची रक्कम जप्त केली होती. पण त्याचवेळी सुमारे सव्वानऊ कोटीची रोकड एलसीबीच्या पथकाने हडप केल्याचे तब्बल एक वर्षानंतर उघडकीस आले. यामध्ये पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार शंकर पाटील, कुलदीप कांबळे, दीपक पाटील, रवींद्र पाटील यांच्याविरुद्ध कोडोली (ता. पन्हाळा) पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा तपास सीआयडी करीत आहेत. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक झालेली नाही. यातील कुरळपकर, शंकर, दीपक व रवींद्र पाटील यांचे अटकपूर्व जामीन घेण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.
बेथेलहेमनगरला पहिल्यांदा कारवाईनंतर याचा तपास करण्यासाठी ११ जणांची ‘टीम’ निवडली होती. ही ‘टीम’च पुढील तपासासाठी वारणानगरला गेली. मिळालेल्या रकमेचा प्रत्येकाने वाटा घेतला; पण हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रत्यक्षात दोन अधिकारी व पाच कर्मचारी, अशा सातजणांविरुद्धच गुन्हा दाखल झाला.‘एलसीबी’ कोमात
सव्वानऊ कोटींचे प्रकरण उघडकीस येऊन एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. या प्रकरणामुळे सांगलीच्या ‘एलसीबी’ला धक्का बसला आहे. महिन्यापासून कोणतीही ठोस कामगिरी नाही. एरव्ही एक-दिवस आड कोणती-ना-कोणती कारवाई केलेली बातमी प्रसारमाध्यमांना दिली जायची; कारवाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे दिली जायची. पण महिन्याभरात कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.
शरण येण्याच्या हालचाली
कुरळपकर, शंकर, दीपक व रवींद्र पाटील यांचा कोल्हापूर न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे ते कोणत्याहीक्षणी सीआयडीला शरण जाण्याची शक्यता आहे. चोरीसह गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांना अटकपूर्व जामीन मिळणे कठीण आहे. तरीही त्यांनी प्रयत्न म्हणून अटकपूर्वसाठी अर्ज केला होता. घनवट, चंदनशिवे व शरद कुरळपकर यांनी अद्याप अटकपूर्वसाठी अर्ज केलेला नाही.
पुरस्कार प्राप्तही लुटीच्या यादीत?
ज्या चार पोलिसांची नावे फिर्यादीत आली नाहीत, ते राष्ट्रपतींचे पदक व पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळालेले पोलीस आहेत, अशी चर्चा सुरू आहे. यातील एक-दोघांनी तर गेल्या कित्येक वर्षांपासून एलसीबीतच तळ ठोकला आहे. अंगावर गणवेश परिधान केलेले त्यांना कधीच पाहायला मिळत नाही. महागड्या गाड्यांतून फिरणे, येईल त्या अधिकाऱ्याशी सलगी वाढवून त्यांच्या मर्जीत राहणे, हा त्यांचा उद्योग आहे.