दोन अधिकाऱ्यांसह चौघांच्या बदल्या, कोल्हापूर महापालिका आयुक्तांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 07:23 PM2018-05-17T19:23:18+5:302018-05-17T19:23:18+5:30

कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकीय कामाची विस्कटलेली घडी सरळ करण्याकरिता आयुक्त अभिजित चौधरी यांनी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करणाऱ्या तसेच कामचोर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी दोन अधिकारी व दोन लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. येत्या काही दिवसांत मोठ्या संख्येने बदल्या होणार आहेत.

Four officials including two officials, Kolhapur municipal commissioner's gang: More transfers | दोन अधिकाऱ्यांसह चौघांच्या बदल्या, कोल्हापूर महापालिका आयुक्तांचा दणका

दोन अधिकाऱ्यांसह चौघांच्या बदल्या, कोल्हापूर महापालिका आयुक्तांचा दणका

Next
ठळक मुद्देदोन अधिकाऱ्यांसह चौघांच्या बदल्या कोल्हापूर महापालिका आयुक्तांचा दणका आणखी बदल्या होणार

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासकीय कामाची विस्कटलेली घडी सरळ करण्याकरिता आयुक्त अभिजित चौधरी यांनी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करणाऱ्या तसेच कामचोर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी दोन अधिकारी व दोन लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. येत्या काही दिवसांत मोठ्या संख्येने बदल्या होणार आहेत.

कोल्हापूर शहर हद्दीत असलेल्या कार्यालयात एकाच ठिकाणी काम करण्यासाठी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचा अट्टाहास असतो. बदल्यांमध्ये राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न होताना दिसतो. त्यामुळे बदल्या करण्याच्या प्रयत्नात कोणी वरिष्ठ अधिकारी पडत नाहीत. एकाच ठिकाणी काम केल्यामुळे या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची मक्तेदारी निर्माण होते. त्याला छेद देण्याचा प्रयत्न आयुक्त अभिजित चौधरी यांनी केला आहे.

वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याकरिता यादी तयार करण्याचे आदेश कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड यांच्यावर सोपविण्यात आले होते. त्याच्या याद्याही तयार झाल्या आहेत. आयुक्त या याद्यांची छाननी करून बदल्यांचा निर्णय घेत आहेत. त्यानुसार गुरुवारी चौघांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले.

परवाना विभागाचे अधीक्षक सचिन जाधव यांची बदली कार्यशाळा विभागाकडे प्रमुख म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्याकडील इस्टेट विभागाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे. स्थानिक संस्था कर विभागाकडील सहायक अधीक्षक रामचंद्र काटकर यांची बदली परवाना अधीक्षक म्हणून करण्यात आली.

त्याचबरोबर नगदीकडील वरिष्ठ लिपिक अनिल भंडारी यांची इस्टेटकडे तर कनिष्ठ लिपिक संदीप उबाळे यांची राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलकडून प्राथमिक शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे. चौघांनाही तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बदल्यांमध्ये राजकीय दडपण आणण्याचा प्रयत्न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

 

Web Title: Four officials including two officials, Kolhapur municipal commissioner's gang: More transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.