भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात दोन बालकांसह चौघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:51 AM2021-09-02T04:51:41+5:302021-09-02T04:51:41+5:30
इचलकरंजी : येथील गावभाग परिसरात भटक्या कुत्र्याने दोन मुलांसह चौघांचा चावा घेऊन गंभीर जखमी केले. ही धक्कादायक घटना मंगळवारी ...
इचलकरंजी :
येथील गावभाग परिसरात भटक्या कुत्र्याने दोन मुलांसह चौघांचा चावा घेऊन गंभीर जखमी केले. ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. चिराग विशाल माळी व नील विनायक पवार या दोन मुलांवर उपचार सुरू असून, एकास सांगलीतील सिव्हील हॉस्पिटलला उपचारासाठी नेण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील गावभाग परिसरातील त्रिशूल चौक, सारवाण बोळ, अवधूत आखाडा, कलावंत गल्ली या भागात भटक्या कुत्र्याने उच्छाद मांडला आहे. या पिसाळलेल्या कुत्र्याने दोन लहान मुलांसह चौघांचा चावा घेऊन त्यांना गंभीरपणे जखमी केले. गेल्या महिन्यांत जवाहरनगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने जवळपास पंधरा जणांचा चावा घेतला होता. यामध्ये चार ते पाच बालकांसह वयोवृद्ध नागरिक जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा गावभाग परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली आहे.
या घटनेनंतर पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांच्या समस्येने तोंड वर काढले आहे. यामुळे भागातील संतप्त नागरिकांनी पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. नगरपालिकेकडे भटक्या कुत्र्यासंदर्भात वारंवार बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर करण्यात आले. तरीही ठोस अंमलबजावणी होताना दिसत नाही. पालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे नागरिकांना या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप भागातील नागरिकांनी केला आहे. कोरोना काळात अशा घटना घडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
फोटो ओळी
३१०८२०२१-आयसीएच-०३ - जखमी चिराग माळी
३१०८२०२१-आयसीएच-०४ - जखमी निल पवार