दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह चौघांना अटक

By admin | Published: June 17, 2016 12:55 AM2016-06-17T00:55:50+5:302016-06-17T00:58:42+5:30

कैद्याच्या अपहरणाचा प्रयत्न : पळून जाताना जखमी झालेल्या तिघांवर सीपीआरमध्ये उपचार

Four policemen arrested along with four | दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह चौघांना अटक

दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह चौघांना अटक

Next

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील कैदी वॉर्डात उपचार घेत असलेला कैदी सोमप्रशांत मधुकर पाटील (वय ४४, रा. बाणेर बालेवाडी रोड, पुणे) याला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह चौघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. याप्रकरणी एकूण सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर पोलिस मुख्यालयातील सहायक फौजदार बाबूराव ज्योतीराम चौगुले (५६, रा. विजय को-आॅपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, बी वॉर्ड, मंगळवार पेठ, कोल्हापूर), पोलिस कॉन्स्टेबल मारुती भाऊसाो पाटील (बक्कल नंबर १०१८) (४५ गोदावरी कॉलनी, पाचगांव ता. करवीर), सोमप्रशांत पाटील,दिग्विजय शिवाजीराव पोवार (३७ रा. सनसिटी न्यू पॅलेस, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान कैदी वॉर्डच्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून पळून जाताना जखमी झालेले संशयित आरोपी संजय दिनेशराव कदम (वय ५९ रा. १७९२, राजारामपुरी नववी गल्ली, कोल्हापूर),जगदिश प्रभाकर बाबर (४४ ,रा. सुभाष रोड , मंडलिक वसाहत, कोल्हापूर), अभिजित शरद चव्हाण (२६ रा. ११८५ /२५ ई वॉर्ड, राजारामपुरी पाचवी गल्ली, कोल्हापूर) या तिघांवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. या गुन्हातील कार, एक दुचाकी, ५३ हजार रुपये, किमती विदेशी दारू, रिकाम्या बाटल्या असा सुमारे नऊ लाख ८९ हजार ६७० रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, पुण्यातील गजा मारणे या टोळीतील सोमप्रशांत पाटील हा सीपीआर येथील कैदी वॉर्डात दि. १३ मे २०१६ पासून मूत्रपिंडाच्या त्रासामुळे उपचारासाठी दाखल आहे. बुधवारी रात्री संशयित सहाय्यक फौजदार बाबूराव चौगुले, कॉन्स्टेबल मारुती पाटील याच्यासह सोमप्रशांत पाटील संशयित दिनेश कदम, जगदिश बाबर, अभिजित चव्हाण, दिग्विजय पोवार हे सातजण कैदी वॉर्डच्या इमारतीच्या टेरेसवर मद्यप्राशन करून जेवायला बसले होते. हा प्रकार पोलिसांना समजताच छापा टाकला. पोलिस आल्याचे पाहताच त्यांची एकच धांदल उडाली. त्यावेळी संजय कदम, जगदिश बाबर व अभिजित चव्हाण या तिघांना इमारतीच्या टेरेसवरून उडी मारली. त्यामध्ये बाबर व अभिजित चव्हाण या दोघांचे पाय फ्रॅक्चर झाले तर संजय कदमचा हात मोडला व ते जखमी झाले. या छाप्यात सोमप्रशांत पाटील, दिग्विजय पोवार व पोलिस कर्मचारी बाबूराव चौगुले, मारुती पाटील या चौघांना पोलिसांनी पकडले. पकडलेले चौघे आणि जखमी तिघे अशा सात जणांना पकडून वैद्यकीय तपासणीसाठी नेले.

‘ते’ दोघे पोलिस वादग्रस्त
संशयित बाबूराव चौगुले हे यापूर्वी एका पोलिस ठाण्यात सेवा बजावत असताना एक आरोपी पळून गेला होता. तसेच मारुती पाटील यांच्यावर यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यामुळे सध्या या दोघांची पोलिस मुख्यालयात नेमणूक होती. पण, सेवा ‘सीपीआर’मधील कैदी वॉर्ड येथे होती. त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल या दोघांविरुद्ध प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी गुरुवारी निलंबनाची प्रक्रिया सुरू केली.

संशयित गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
संशयित जगदीश बाबर याने एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगली आहे. संजय कदम हाही एका प्रकरणात आरोपी होता. त्यातून त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. उर्वरित पोवार व चव्हाण यांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी गुरुवारी सांगितले.

दोन दिवस कोठडी
अटक केलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह चौघांना गुरुवारी दुपारी कसबा बावडा येथील न्यायसंकुलामधील न्यायालयात लक्ष्मीपुरी पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चौघांना दोन दिवस पोलिस कोठडी दिली. त्यानंतर त्यांना ‘सीपीआर’मध्ये सायंकाळी वैद्यकीय तपासणी नेण्यात आले.

सीपीआर, पोलिस ठाण्याजवळ गर्दी
बुधवारी रात्री या सातजणांना पकडल्यानंतर ‘सीपीआर’च्या आवारात गर्दी होती. हा प्रकार समजताच शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे हे याठिकाणी आले. त्यांनी या प्रकाराची माहिती घेतली. तसेच गुरुवारी याबाबतचे दैनिकांत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आरोपींच्या समर्थकांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर दुपारपर्यंत गर्दी केली होती.

या कलमाखाली गुन्हा : या आरोपींविरोधात भारतीय दंडविधान संहिता कलम १२० (ब) (कट रचणे), २२२ (गुन्हेगारांना मदत करणे), ३४ (समान हेतू) अशा कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Four policemen arrested along with four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.