‘गोकुळ’साठी चौघांची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:23 AM2021-04-17T04:23:24+5:302021-04-17T04:23:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’साठी शुक्रवारी चौघांनी माघार घेतली. आतापर्यंत १२ जणांनी माघार घेतली असून, अद्याप ३७८ अर्ज ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’साठी शुक्रवारी चौघांनी माघार घेतली. आतापर्यंत १२ जणांनी माघार घेतली असून, अद्याप ३७८ अर्ज शिल्लक आहेत. माघारीसाठी सोमवार (दि. १९) पासून दोनच दिवस मिळणार असल्याने अक्षरश: झुंबड उडणार आहे.
‘गोकुळ’च्या २१ जागांसाठी ४८२ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील छाननीनंतर २४१ जणांचे ३९० अर्ज वैध ठरले. ६ एप्रिलपासून माघारीस सुरुवात झाली असून शुक्रवारी चौघांनी माघार घेतली. यामध्ये महिला गटातून आरती अभिजित तायशेटे, अनुसूचित जाती-जमाती गटातून पांडुरंग कांबळे, सर्वसाधारण गटातून विद्यमान संचालक विश्वास जाधव व अविनाश पाटील यांनी माघार घेतली. आतापर्यंत १२ जणांनी माघार घेतली असून अद्याप ३७८ अर्ज शिल्लक आहेत. मंगळवार (दि. २०) माघारीचा अखेरचा दिवस असल्याने सोमवारपासून झुंबड उडणार आहे.
माघारीसाठी येताना नामनिर्देशन दाखल केलेली पोहोच सोबत असणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर माघारीसाठी इच्छुक, सूचक किंवा अनुमोदक यापैकीला एकालाच प्रवेश दिला जाणार असून मास्क बंधनकारक असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी सांगितले.
पॅनल बांधणी अंतिम टप्प्यात
सत्तारुढ व विरोधी आघाडीची पॅनल बांधणी अंतिम टप्प्यात आली आहे. आज, शनिवार पासून दोन दिवसात पॅनलला अंतिम स्वरुप देण्यात येणार असल्याने घडामोडी वेगावल्या आहेत.
३५ केंद्रांसाठी ३०८ अधिकाऱ्यांची नेमणूक
मतदान बारा तालुक्यात ३५ केंद्रांवर होणार आहे. त्यासाठी ३०८ अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना १८ व २७ एप्रिल रोजी प्रशिक्षण दिले जाणार आहे.