तासगाव येथे चार शाळकरी मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू
By Admin | Published: March 24, 2017 12:16 AM2017-03-24T00:16:53+5:302017-03-24T00:16:53+5:30
सातारा तालुक्यातील घटना : दोन सख्ख्या भावंडांचा समावेश
अंगापूर : मुळीकवाडी (तासगाव), ता. सातारा येथील चार शाळकरी मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. मात्र, सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मुळीकवाडी येथील कुरणाचा ओढ्यालगत असणाऱ्या विहिरीत पोहण्यासाठी गावातीलच शाळकरी चार मुले गेली होती. यामध्ये दोन सख्ख्या भावंडांचाही समावेश होता. विहिरीत पोहताना चौघेही बुडाले. मात्र, सायंकाळपर्यंत याची कोणालाही माहिती नव्हती. सायंकाळच्या पाचच्या सुमारास तेथून जाणाऱ्यांना विहिरीवर कपडे दिसली. त्यावरून अंदाज बांधून चौकशी केल्याने हा प्रकार उघडकीस आला. यामध्ये सिद्धार्थ संतोष कांबळे (वय ११), अक्षय विश्वास काळभोर (१२), करण सुनील कांबळे (११) आणि त्याचा सख्खा भाऊ राजरत्न सुनील कांबळे (१३) यांचा समावेश आहे.
दरम्यान, तासगावचे पोलिस पाटील रामपुरी गोसावी यांनी घडलेल्या घटनेची माहिती सातारा तालुका पोलिस स्टेशनला दिली. ही माहिती मिळताच सातारा तालुका स्टेशनचे पोलिस निरीक्षक डी. जी. नाळे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळवर आले. (वार्ताहर)
विहिरीत १५ फूट पाणीसाठा...
सायंकाळी उशिरा पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. या विहिरीत सुमारे १५ फूट पाणी होते. रात्री उशिरा सातारा येथे शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यात आले होते. दरम्यान, सख्ख्या भावंडांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळीच या मुलांची आई आजारी असल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.