चारला शटर बंद, सोमवारपासून उघडण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:17 AM2021-07-10T04:17:13+5:302021-07-10T04:17:13+5:30
कोल्हापूर : सरकारने प्रायोगिक तत्वावर पाच दिवस सरसकट दुकाने सुरू ठेवण्याची दिलेली मुदत संपल्यानंतर शुक्रवारी दुपारी चार वाजता शटर ...
कोल्हापूर : सरकारने प्रायोगिक तत्वावर पाच दिवस सरसकट दुकाने सुरू ठेवण्याची दिलेली मुदत संपल्यानंतर शुक्रवारी दुपारी चार वाजता शटर बंद झाली. शहरातील अत्यावश्यक सेवा, वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली. महापालिका प्रशासनाच्या पथकानेही बाजारपेठेत प्रमुख ठिकाणी फिरून नियमाप्रमाणे दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.
शहर, जिल्ह्यात कोरोनाची रूग्णसंख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे सरकारने अत्यावश्यक सेवा, वस्तू वगळता इतर दुकाने उघडण्यावर निर्बंध आणले होते. पण गेल्या आठवड्यात शहरातील व्यापारी, दुकानदार यांनी आक्रमक पवित्रा घेत दुकाने सुरू करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे ४ जुलैला रविवारी रात्री उशिरा सरकारने प्रायोगिक तत्वावर पाच दिवस सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी दिली. अशीच परवानगी जिल्ह्यातील इतर शहरांतील दुकानदारांनाही मिळावी, अशी मागणी विविध संघटना, लोकप्रतिनिधींनी केली. दरम्यान, कोल्हापूर शहरासाठी पाच दिवसांची दिलेली मुदत संपल्याने चार वाजता दुकाने बंद करण्यात आली. यामुळे शहरात सकाळच्या सत्रात झालेली गर्दी सायंकाळी कमी झाली. बिंदू चौक, महाव्दार रोड, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी, आदी ठिकाणची दुकाने बंद होताच शुकशुकाट पसरला होता. महापालिका इस्टेट विभागाच्या पथकाने शहरात फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले.
चौकट
शनिवार, रविवारी निर्बंध
वीकेंड लॉकडाऊन कायम असल्याने शनिवारी, रविवारी निर्बंध कडक राहणार आहेत. यामुळे सरसकट दुकाने सुरू ठेवण्यासंबंधीचा आदेश रविवारी निघणार की त्याआधी काढला जाणार, याविषयी दुकानदार, व्यावसायिकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. पण सुधारित आदेश सरसकट दुकाने सुरू ठेवण्यासंबंधीचा असावा, यासाठी व्यापारी संघटना, चेंबरचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
कोट
रूग्णसंख्येत वाढ झाली नाही तर सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी वाढविण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले होते. यानुसार सोमवार ते शुक्रवारपर्यंत सरसकट दुकाने सुरू राहिली तरी रूग्णसंख्येत वाढ झालेली नाही. यामुळे सरकारने परवानगीला मुदतवाढ द्यावी.
- ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीज
कोट
आठवड्यात शहराचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे. यामुळे सरसकट दुकाने सुरू ठेवण्याच्या परवानगीत वाढ करण्यास काही अडचण नाही. परवानगीचा सुधारित आदेश सरकार लवकरच काढेल. त्यानंतर सोमवारपासून दुकाने नियमितपणे सुरू राहतील. परवानगी देण्यासंबंधी सरकार सकारात्मक आहे.
- संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स
फोटो : ०९०७२०२१-कोल- महाव्दार रोड दुकान बंद
कोल्हापुरातील महाव्दार रोडवरील दुकाने शुक्रवारी चार वाजता बंद झाल्याने असा शुकशुकाट पसरला होता.
फोटो : आदित्य वेल्हाळ
फोटो : ०९०७२०२१-कोल- दुकाने बंद
कोल्हापुरातील महाव्दार रोडवरील दुकाने शुक्रवारी चार वाजता बंद करण्यात आली.
फोटो : आदित्य वेल्हाळ