चिपरीच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून चोरीच्या चार मोटारसायकली जप्त
By भीमगोंड देसाई | Published: October 11, 2022 09:29 PM2022-10-11T21:29:59+5:302022-10-11T21:30:15+5:30
पोलिसांनी म्हटले आहे, की जिल्ह्यात सध्या मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांना चोरीच्या घटनांचा तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोल्हापूर - रेकॉर्डवरील गुन्हेगार हसनअली ऊर्फ डम्प्या मस्तान ईराणी (रा. बेघर वसाहत, चिपरी, ता. शिरोळ) याच्याकडून १ लाख २५ हजार रुपये किमतीच्या चोरीच्या चार मोटारसायकली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी जप्त केल्या. शिये फाटा येथे सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी म्हटले आहे, की जिल्ह्यात सध्या मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांना चोरीच्या घटनांचा तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तपास करीत असताना गुन्हेगार हसनअली हा मंगळवारी शिये फाटा येथे नंबरप्लेट नसलेली चोरीची मोटारसायकल विक्रीस आणणार असल्याची माहिती मिळाली. यानुसार पोलिसांनी सापळा रचला. हसनअली येताच त्याला मोटारसायकलसह ताब्यात घेतले.
पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपल्याकडील मोटारसायकल शिरोळ तालुक्यातील उदगाव धनगर गल्लीतून रात्रीच्या वेळी चोरल्याचे सांगितले. याची खात्री करून घेण्यासाठी पोलिसांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यावेळी येथे मोटारसायकल चोरीची नोंद असल्याचे समोर आले. यामुळे हसनअलीकडे पोलिसांनी पुन्हा चौकशी केली. त्यावेळी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले.
मलकापूर, सांगली, ठाणे शहरांतूनही चोरी -
हसनअलीने मलकापूर, सांगली व ठाणे शहर येथून आणखी मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सुझुकी कंपनीच्या दोन ॲक्सेस मोपेड, एक प्लेजर मोपेड, एक स्प्लेंडर अशा एकूण १ लाख २५ हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकल जप्त केल्या आहेत.
फोटो : १११०२०२२-कोल- मोटारसायकल चोरी
कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी हसनअली ऊर्फ डम्प्या मस्तान ईराणी याच्याकडून चोरीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या.