Kolhapur: पोर्लेतील खूनप्रकरणी फरार चौघांना अटक, पै-पाहुण्यांनी कट रचून विकासचा केला खून
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 02:04 PM2024-05-22T14:04:35+5:302024-05-22T14:06:49+5:30
पन्हाळा पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे येथील अनैतिक संबंधातून झालेल्या विकास पाटील यांच्या खूनप्रकरणी चार संशयितांना पन्हाळा पोलिस आणि कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकांनी सोमवारी मध्यरात्री ताब्यात घेऊन अटक केली, तर कटात सामील असणारा पाचवा संशयित आरोपी पंढरीनाथ कांबळे हा अद्यापही फरारी असून, पोलिस त्याच्या मागावर आहेत.
ही कारवाई पन्हाळा पोलिस आणि कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण यांच्या संयुक्त पथकांनी ३६ तासांत केली. संशयित आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
खून प्रकणातील मुख्य संशयित मुख्य आरोपी युवराज शिवाजी गायकवाड (वय ३४ ), शरद बळवंत पाटील (वय ३७, दोघेही रा. पोर्ले तर्फ ठाणे, ता. पन्हाळा), ओंकार शिवाजी वरुटे (वय २५), सोमनाथ पंडित वरुटे (वय २७, रा. आरे, ता. करवीर) अशी आरोपींची नावे आहेत.
रविवारी (दि.१९) सांयकाळी विकास पाटील यांचा खून करून पाचही संशयित आरोपी घटना स्थाळावरून पसार झाले होते. युवराजचा मेहुणा शरद पाटील यांनी विकासच्या येण्या-जाण्याची माहिती दिली, तर ओंकार आणि सोमनाथ वरुटे ही युवराजच्या मामाची मुले असून, त्यांनी विकासला मारहाण केली होती. पै-पाहुण्यांनी कट रचून विकासचा खून केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींना पकडण्यासाठी पन्हाळा पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणची तीन पथके आरोपींच्या मागावर होती. सोमवारी आरोपीच्या चौकशीसाठी सोमनाथ वरुटे आणि शरद पाटील यांना ताब्यात घेतले होते.
चौकशीतून हे दोघेजण खुनाच्या कटात सामील असल्याची बाब समोर आल्याने सोमवारी दोघांना अटक केली होती. सोमवारच्या मध्यरात्री मुख्य आरोपी युवराज गायकवाड आणि ओंकार वरुटे ज्योतिबा-केर्ली फाट्यावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी रात्री १:३० च्या सुमारास पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. यातील पाचवा आरोपी पंढरीनाथ कांबळे हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
सातारा येथून येताना अटक
विकासचा खून केल्यानंतर शरद पाटील हा पोर्ले, तर सोमनाथ वरुटे हा आरे गावात होता. या दोघांना चौकशीतून पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. मुख्य आरोपी युवराज गायकवाड आणि ओंकार वरुटे हे दोघे रविवारी निगवे (ता. करवीर) येथील परिसरात रात्रभर होते. त्यानंतर सोमवारी दोघेही साताऱ्याला गेले होते. दिवसभर तेथे थांबून सांयकाळी साताऱ्यातून ट्रकने कोल्हापूर येताना ज्योतिबा-केर्ली फाट्यावर रात्री १:३० वाजता उतरले होते. अंधारात उभे असलेल्या युवराज आणि ओंकारला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी पकडून पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात दिले.