वारणानगर चोरीप्रकरणी सांगलीच्या निलंबित ४ पोलिसांचा जामीन फेटाळला

By admin | Published: May 6, 2017 07:08 PM2017-05-06T19:08:33+5:302017-05-06T19:08:33+5:30

सुमारे तीन तास न्यायालयात सुनावणी

Four of the suspended policemen of Sangli's Wiranagar court rejected the bail | वारणानगर चोरीप्रकरणी सांगलीच्या निलंबित ४ पोलिसांचा जामीन फेटाळला

वारणानगर चोरीप्रकरणी सांगलीच्या निलंबित ४ पोलिसांचा जामीन फेटाळला

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर , दि. 0६ : कोल्हापूर जिल्हयातील वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील चोरीप्रकरणी निलंबित केलेल्या सांगलीतील चार पोलिसांचा अटकपुर्व जामीन अर्ज शनिवारी येथील जिल्हा न्यायाधीश क्रमांक दोन-वृषाली व्ही. जोशी यांनी फेटाळला.

वारणानगर चोरी प्रकरणात प्रचंड मोठी रक्कम आहे व हा तपास अपुरा, नेमकी किती पैश्यांची चोरी झाली हे स्पष्ट होत नाही. सकृतदर्शनी या प्रकरणात हे पोलिस असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या पोलिसांना जामीन देणे योग्य नाही, जामीन झाला तर संशयित आरोपी संशयाचा फायदा घेऊ शकतात असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. विवेक शुक्ल यांनी केला.

शुक्रवारी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे बडतर्फ संशयित सहाय्यक फौजदार शरद कुरळपकर, कॉन्स्टेबल शंकर महादेव पाटील, (वय ५२, रा. महादेवनगर, सांगली), दीपक उत्तमराव पाटील (४१, रा. विधाता कॉलनी, विश्रामबाग सांगली), पोलिस नाईक रवींद्र बाबूराव पाटील (रा. कागल) या चौघांनी अटकपुर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. यावर शनिवारी सुमारे तीन तास जोशी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.

वारणानगर शिक्षक कॉलनीतील रुम नंबर तीनमध्ये मार्च २०१६ मध्ये चोरी झाली होती. बांधकाम व्यावसायिक झुंझार सरनोबत यांच्या खोलीमधील सुमारे ९ कोटी १८ लाख रुपये चोरीस गेले होते. या प्रकरणी संशयित मैनुद्दीन मुल्ला याच्यासह विनायक जाधव, संदीप तोरस्कर यांच्यावर कोडोली पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे -पाटील यांच्या आदेशानुसार अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, सांगलीचे तत्कालीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी चौकशी केल्यानंतर सांगली पोलीसांनी तपासाच्या नावाखाली कोटयवधी रुपयांवर डल्ला मारल्याचे समोर आले. त्यामुळेच १६ एप्रिल २०१७ मध्ये कोडोली पोलीस ठाण्यात सात पोलिसांवर गुन्हा दाखल झाला.

याप्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट,सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, पोलीस हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, पोलिस नाईक रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे या ७ जणांवर कोडोली पोलिसात गुन्हा दाखल झाला.याप्रकरणी सात जणांना निलंबित केले आहे.

गुन्हा दाखल झालेल्या या सात पोलिसांपैकी शरद कुरळपकर, रवि पाटील, दीपक पाटील व शंकर पाटील या चौघांनी अटकपुर्व जामिनसाठी अर्ज केला होता. दोन दिवस यावर सुनावणी झाली. शनिवारी सुनावणीवेळी संशयित कुरळपकर यांच्यावतीने अ‍ॅड. धनंजय पठाडे, रविंद्र पाटील यांच्यावतीने अ‍ॅड. शिवाजीराव राणे तर शंकर पाटील व दीपक पाटील यांच्यातर्फे सांगलीतील अ‍ॅड. श्रीकांत जाधव यांनी न्यायालयात युक्तीवाद केला.

रक्कमेच्या मुळ मालकास चौकशीच्या फेऱ्यापासून वाचवण्यासाठीच या प्रकरणात पोलीसांना बळीचा बकरा केले जात असल्याचे संशयित आरोपींच्या वकीलांनी सांगितले. त्यानंतर जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. विवेक शुक्ल यांनी, बांधकाम व्यावसायिक झुंझारराव सरनोबत यांच्या एक नातेवाईकाचा मुलगा असे दोघेजण वारणानगर परिसरात व्यवसाय सुरु करणार होते. त्यासाठी त्यांनी जुन २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत सुमारे सहा कोटी रुपये वारणानगर येथील शिक्षक कॉलनी (बिल्डिंग नंबर पाच ) प्लॉट नंबर तीनमधील खोलीत ठेवले होते. मार्च २०१६ मध्ये या खोलीतील ही रक्कम चोरीस गेली. दरम्यान, संशयित आरोपी मैनुद्दीन मुल्ला याच्या मिरजेतील मेव्हणीच्या घरात सुमारे तीन कोटी रुपये सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांना सापडले. तपासात वारणानगर येथे चोरी केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी १३ ते १७ मार्च २०१६ न्यायालयाने पोलिस कोठडी दिली. तपासासाठी १३ मार्चला सूरज चंदनशिवे यांच्यासह पोलिसांनी वारणानगर येथे नेले. त्यावेळी चंदनशिवे व पोलिसांनी दोन बँगेतून सुमारे सहा कोटी रुपये नेले. त्यानंतर ते मिरजेत आल्यानंतर मैनुद्दीनला एका चौकात थांबवून चंदनशिवे हा पैश्याची बॅग घेऊन गेला. १५ ते २० मिनिटानंतर चंदनशिवे हा त्याठिकाणी आला. त्याने हा प्रकार घनवट यांना सांगायचा नाही, यातील पैश्याचा काही हिस्सा तुला देतो, असे म्हणून त्याला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात नेले.

त्यानंतर १५ मार्च २०१६ ला पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांनी, मैनुद्दीन मुल्लाला तपासासाठी पुन्हा वारणानगर येथे नेले. तेथे घनवटसह अन्य पोलिसांनी शिक्षक कॉलनीतील खोलीमधून सुमारे तीन कोटी रुपये नेले असा पुरवणी जबाब झुंझारराव सरनोबत यांनी दिला आहे. ही दोन्ही वेळेची रक्कम तपासात कुठेही दाखविलेली नाही,असा युक्तिवाद केला.

सरनोबत यांचा अर्ज...

झुंझारराव सरनोबत यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे, शिक्षक कॉलनीतील खोलीमध्ये जास्त पैसे होते, फिर्याद देतेवेळी माझी मानसिक स्थिती व्यवस्थित नव्हती. मी सुमारे चार कोटी ४० लाख रुपयांची फिर्याद दिली होती, त्यामुळे या प्रकरणाचा फेरतपास करावा अशी मागणी १९ सप्टेंबर २०१६ ला अर्जाद्वारे केली. त्यानूसार नांगरे -पाटील यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडे तपास दिला. 

पोलीस इरफान नदाफचा चोरीत समावेश

मैनुद्दीन मुल्ला यास वारणानगर शिक्षक कॉलनीत मोठी रक्कम आहे याची माहिती होती. त्यामुळे त्याने सांगली पोलीस दलात काम करणारा व त्याचा नातेवाईक कॉन्स्टेबल निलंबित इरफान नदाफ याला ही माहिती दिली. मैनुद्दीन, त्यांचे मित्र संदीप तोरस्कर, विनायक जाधव व इरफान नदाफ अशा चौघांनी मार्च २०१६ मध्ये वारणानगर येथे चोरी केली. तेव्हा त्यांच्या हाती ६ कोटी रुपये लागले होते. त्यातील ३ कोटी मैनुद्दीनने स्वत:कडे ठेवले तर उर्वरित तीन कोटी इरफान, संदीप, विनायक यांना वाटून घेण्यास सांगितले, असे झुंजार सरनोबत यांनी पुरवणी जबाबात म्हटले असल्याचा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. विवेक शुक्ल यांनी यावेळी केला.

प्रकरण मिटविण्यासाठी रवि इंगवले यांच्याकडे धाव

वारणानगर येथील घबाड प्रकरण अंगलट येणार असे लक्षात येताच सांगलीचा सूरज चंदनशिवे हा अधिकारी कोल्हापूरातील माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांच्याकडे या प्रकरणात मध्यस्ती करण्यासाठी आला होता. मात्र, यात तोडगा निघाला नाही असे चंदनशिवेने तपासात अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांना सांगितले. त्यानूसार शर्मा यांनी रवि इंगवले याच्याकडे याबाबतची चौकशी केली असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. विवेक शुक्ल यांनी केला.

चंदनशिवेने घबाडमधील दिले मित्राला ४० लाख

सूरज चंदनशिवे याने सोलापूर जिल्हयातील सांगोला मधील प्रवीण भास्कर-सावंत याला वारणानगर येथे डल्ला मारलेल्या रकमेतील ४० लाख रुपये दिले. सावंतनेही ही रक्कम बँकेत जमा केली. पोलिसांनी सावंतकडे तपास केल्यानंतर त्याने भिशीमधील पैसे बँकेत भरले असल्याचे सांगितले .पोलिसांनी दोन भिशी चालकांकडे चौकशी केली असता त्यातील एका भिशी चालकाने चार लाख तर दुसऱ्याने दोन लाख असे सहा लाख रुपये सावंतला मिळाल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी ४० लाख रुपयांची रक्कम जप्त केले असल्याचे तपासात पुढे आले आहे.


वारणानगर येथील चोरीचा तपास अपुर्ण आहे. हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. त्यामुळे या प्रकरणात संशयितांना अटकपुर्व जामिन मिळणे कठीण होते.
-अ‍ॅड.विवेक शुक्ल, जिल्हा सरकारी वकील,कोल्हापूर.

 

Web Title: Four of the suspended policemen of Sangli's Wiranagar court rejected the bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.