कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस; शिरोळसह चार तालुक्यांनी ओलांडली जूनची सरासरी, ७ बंधारे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 11:59 AM2024-07-01T11:59:40+5:302024-07-01T12:00:11+5:30

पंचगंगेच्या पातळीत वाढ, भोगावती नदीचे पाणी पात्राबाहेर

four taluka including Shirol rain exceeded June average In Kolhapur district, 7 dams under water | कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस; शिरोळसह चार तालुक्यांनी ओलांडली जूनची सरासरी, ७ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस; शिरोळसह चार तालुक्यांनी ओलांडली जूनची सरासरी, ७ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : गेली महिनाभर पावसाची उघडझाप सुरू असल्याने जून महिन्यातील सरासरीच्या ५५ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. शिरोळसह चार तालुक्यांनी जूनची सरासरी ओलांडली असून, सर्वाधिक पाऊस हातकणंगले तालुक्यात १९१ मिलिमीटर झाला आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर भोगावती नदीपात्रातील पाणी प्रथमच पात्राबाहेर आले आहे. 

यंदा मान्सूनने वेळेवर हजेरी लावली. जूनमध्ये जोरदार कोसळेल, असा अंदाज अगोदरच हवामान विभागाने वर्तविला होता. पण महिन्याभरात उघडझाप राहिली. जिल्ह्याची जूनची सरासरी ३६२ मिलिमीटर आहे. त्यापैकी १९९ मिलिमीटर पावसाची नाेंद झाली आहे. सरासरीच्या ५५ टक्के पाऊस झाला असून, गेल्यावर्षी केवळ २५ टक्केच पाऊस झाला होता.

महिन्याभरात हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी व कागल तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. रविवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली असली तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यात पाऊस चांगला झाला आहे. धरण क्षेत्रातही रोज पाऊस असल्याने पाणी साठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, पंचगंगा १७.७ फुटांवर आहे. ‘राजाराम’सह सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

राधानगरी सर्वांत मागे

धरणाचा तालुका म्हणून राज्यात ओळख असलेल्या राधानगरी तालुक्यात गेल्या काही वर्षांत सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस होत आहे. जूनची सरासरी ६६४ मिलिमीटर होती, त्यापैकी केवळ २४९ मिलिमीटर ( ३७ टक्के) पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील ७ बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून ११०० क्युसेक विसर्ग

जिल्ह्यातील राधानगरी धरणात २.५४ टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, कासारी नदीवरील यवलूज असे ७ बंधारे पाण्याखाली आहेत.

धरणांमधील पाणीसाठा 

राधानगरी २.५४ टीएमसी, तुळशी १.३३ टीएमसी, वारणा ११.८५ टीएमसी, दूधगंगा ४.५३ टीएमसी, कासारी ०.९२ टीएमसी, कडवी १.२८ टीएमसी, कुंभी ०.९२ टीएमसी, पाटगाव १.६१ टीएमसी, चिकोत्रा ०.५१ टीएमसी, चित्री ०.५६ टीएमसी, जंगमहट्टी ०.४९ टीएमसी, घटप्रभा १.४३ टीएमसी, जांबरे ०.५४ टीएमसी, आंबेआहोळ ०.८९ टीएमसी, सर्फनाला ०.०३ टीएमसी व कोदे लघु प्रकल्प ०.०८ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

बंधाऱ्यांची पाणीपातळी

 राजाराम १७.१० फूट, सुर्वे १९.५ फूट, रुई ४५ फूट, इचलकरंजी ४३.२ फूट, तेरवाड ३९.९ फूट, शिरोळ ३१ फूट, नृसिंहवाडी २४ फूट, राजापूर १३.६ फूट तर नजीकच्या सांगली ७.९ फूट व अंकली ८.१ फूट अशी आहे.

तालुकानिहाय जून महिन्यात झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा 

तालुका - जूनची सरासरी - प्रत्यक्ष पाऊस
हातकणंगले  - ११७   - १९१
शिरोळ - १०३  - १०६
पन्हाळा  - ३१० -  १५७            
शाहूवाडी - ३५४  - ३६२
राधानगरी  - ६६४  - २४९
गगनबावडा - १०७० - ५५६
करवीर - १८३  - ११९
कागल  - १२७  -  १४०
गडहिंग्लज - १८५ - १५८
भुदरगड - ३३९  -  ३२५
आजरा - ३९०  -  २१६
चंदगड - ५६८  -  २५५

Web Title: four taluka including Shirol rain exceeded June average In Kolhapur district, 7 dams under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.