मुंबई, शिवाजी विद्यापीठाची बाजी -पश्चिम विभागीय कबड्डी स्पर्धा; आज समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 01:49 PM2018-11-29T13:49:16+5:302018-11-29T14:26:26+5:30
पश्चिम विभागीय पुरूष कबड्डी स्पर्धेत गुरूवारी मुंबई विद्यापीठाने कोटा विद्यापीठाला, तर शिवाजी विद्यापीठाने औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नमवून बाजी मारली.
कोल्हापूर : पश्चिम विभागीय पुरूष कबड्डी स्पर्धेत गुरूवारी मुंबई विद्यापीठाने कोटा विद्यापीठाला, तर शिवाजी विद्यापीठाने औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नमवून बाजी मारली. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या या संघांमध्ये मानांकनासाठी लढती सुरू झाल्या. आज, शुक्रवारी स्पर्धेचा सकाळी अकरा वाजता समारोप होणार आहे.
शिवाजी विद्यापीठातील लोककला केंद्रात कबड्डी स्पर्धा सुरू आहे. त्यात गुरूवारी सकाळी पहिली लढत मुंबई विद्यापीठ आणि कोटा विद्यापीठात झाली. आक्रमक चढाया आणि सुंदर पकडी करीत मुंबई विद्यापीठाने सामन्यावर वर्चस्व राखले. कोटा विद्यापीठाच्या चढाया कमी पडल्या.
अखेर ‘मुंबई’ ने ‘कोटा’वर ४१-२५ गुणांनी मात केली. या सामन्यासाठी सुनील कदम, कुबेर पाटील, विजय खराडे, सोनल बाबर, उत्तम नलवडे, बाळासो पाटील, बाळकृष्ण ढवळे यांनी पंच म्हणून काम पाहिले. शिवाजी विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दुसरी लढत चुरशीने झाली. या दोन्ही विद्यापीठांचे संघ एक वर्षानंतर अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. त्यांच्यात सामना चुरशीने झाला. त्यात वेगवान, आक्रमक चढाया करीत शिवाजी विद्यापीठाने गुणांची कमाई सुरू केली. त्याच्या तुलनेत औरंगाबाद विद्यापीठाकडून चांगल्या चढाया झाल्या. मात्र, बचावात हा संघ थोडा कमी पडला. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाने औरंगाबाद विद्यापीठावर ३७-२५ गुणांनी विजय मिळविला.
शिवाजी विद्यापीठाकडून अक्षय निकम, राहुल वडार, ऋषिकेश देसाई यांनी, तर औरंगाबाद विद्यापीठाच्या आकाश पिकलगुंडे, आकाश गव्हाणे, विशाल घनगाव यांनी उत्कृष्ट खेळ केला. या सामन्यासाठी शहाजान शेख, प्रदीप बनगे, राजेंद्र बनसोडे, दिलीप चव्हाण, ऋषिकेश लोहार, रमजान देसाई, अमोल सूर्यवंशी हे पंच होते.
गुणांवर ठरणार मानांकन
या स्पर्धेत मुंबई, औरंगाबाद, कोटा आणि शिवाजी विद्यापीठात साखळी सामने होतील. त्यात मिळणाऱ्या गुणांच्या आधारावर या संघाचे राष्ट्रीय स्पर्धेसाठीचे मानांकन ठरणार आहे. या चार संघांना यावर्षी कोल्हापूर जिल्हा कबड्डी संघटनेतर्फे चषक देवून सन्मानित केले जाणार असल्याचे संघटनेचे सदस्य बाबासाहेब उलपे यांनी संगितले.
कोल्हापुरात गुरूवारी पश्चिम विभागीय पुरूष कबड्डी स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ आणि औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात चुरशीने सामना झाला.
कोल्हापुरात गुरूवारी पश्चिम विभागीय पुरूष कबड्डी स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ आणि औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सामना पाहण्यास प्रेक्षकांनी गर्दी केली. (छाया : नसीर अत्तार)