‘आरटीई’ मोफत प्रवेशासाठी चार हजार विद्यार्थ्यांचे अर्ज, जिल्ह्यात ३४१ शाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 12:34 PM2022-03-15T12:34:21+5:302022-03-15T12:34:48+5:30
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई २००९) अंतर्गत वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो.
कोल्हापूर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई २००९) अंतर्गत वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो. कोल्हापूर जिल्ह्यातील ३४१ शाळांमधील प्रवेशासाठी ४,४७८ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील ३,४५६ विद्यार्थ्यांनी अर्जनिश्चिती केली असून, अद्याप १,०२२ अर्ज निश्चित होणे बाकी आहे.
आरटीई प्रवेशाच्या अर्जासाठी दि. २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. मात्र, अनेक शाळांना आरटीई प्रवेशाच्या नोंदणीसाठीच वेळ लागल्यामुळे अनेक पालकांना अर्ज भरण्यासाठी अडचणी आल्याचे संचालनालयाच्या लक्षात आले. यामुळे कोणाही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन त्याची प्रवेशाची संधी वाया जाऊ नये, यासाठी आरटीई प्रवेशाच्या अर्जासाठी दि. १० मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती.
२५ टक्के जागा राखीव
कोल्हापूर जिल्ह्यात आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणाऱ्या शाळांची संख्या ३४१ इतकी आहे. तेथील २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी प्रवेशाच्या एकूण जागा ३,३१४ आहेत.
या कागदपत्रांची आवश्यकता
आरटीई अंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांचे निवासी पुरावा म्हणून शिधापत्रिका (रेशनकार्ड), पालकांचा वाहन चालविण्याचा परवाना, वीज अथवा दूरध्वनी बिल, मिळकत कर देयक, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.
आरटीई प्रवेशांतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया संपली आहे. आता यापुढील टप्प्यात शिक्षण विभागाकडून प्रवेशासाठी एकत्रितपणे राज्यस्तरीय लॉटरीची प्रक्रिया होणार आहे. - आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी
आरटीई अंतर्गत नोंदणीकृत शाळा : ३४१
उपलब्ध जागा : ३३१४
प्राप्त अर्ज : ४४७८
कोणत्या तालुक्यात किती जागा?
कोल्हापूर शहर : १२१९
हातकणंगले : १०५१
करवीर : ६४०
शिरोळ : ३७७
कागल : २३१
गडहिंग्लज : १९७
पन्हाळा : १८८
चंदगड : ९८
राधानगरी : ६४
भुदरगड : ४६
शाहूवाडी : ३०
आजरा : १६