कोल्हापूर जिल्ह्यात महिनाभरात कोरोनाचे चार बळी, आरोग्य विभाग झाला अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 11:41 AM2023-04-01T11:41:33+5:302023-04-01T11:41:52+5:30
दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ
कोल्हापूर: जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून, मृत्यूचीही संख्या वाढू लागली आहे. मार्च महिन्यात गुरुवारपर्यंत तीन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी आणखी एका ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एका मार्च महिन्यात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या चारवर गेली आहे.
गेल्या २४ तासांत नव्याने तिघांना कोरोनाची लागण झाली असून, त्यामुळे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ५४ झाली आहे. यातील १५ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील एक आणि कागल, हातकणंगले तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. शुक्रवारी निधन झालेली महिला ही हातकणंगले येथील आहे.
दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना, आता आरोग्य विभागही अलर्ट झाला असून, त्यादृष्टीने तालुका पातळीवर सूचना देण्यात आल्या आहेत.