कोल्हापूर जिल्ह्यात अन्न विषबाधेचे चार बळी; चिमगावात भाऊ-बहिण तर मांडरेतील दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 12:07 PM2024-12-04T12:07:21+5:302024-12-04T12:08:34+5:30

मुरगूड : चिमगाव (ता. कागल) येथील श्रीयांश रणजित आंगज (वय ५), काव्या रणजित आंगज (८) या भावंडांचा विषबाधेने दुर्दैवी ...

Four victims of food poisoning in Kolhapur district; A brother and sister died in Chimgaon and two died in Mandare | कोल्हापूर जिल्ह्यात अन्न विषबाधेचे चार बळी; चिमगावात भाऊ-बहिण तर मांडरेतील दोघांचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यात अन्न विषबाधेचे चार बळी; चिमगावात भाऊ-बहिण तर मांडरेतील दोघांचा मृत्यू

मुरगूड : चिमगाव (ता. कागल) येथील श्रीयांश रणजित आंगज (वय ५), काव्या रणजित आंगज (८) या भावंडांचा विषबाधेने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. श्रीयांश याचा सकाळी, तर काव्या हिचा मंगळवारी संध्याकाळी मृत्यू झाला. दोघांचाही मृत्यू विषबाधेने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असला तरी काव्याचा व्हिसेरा राखून ठेवल्याने मृत्यूचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

अधिक माहिती अशी, चिमगाव येथील रणजित आंगज हे पुणे येथील एका खासगी कंपनीत नोकरीस होते; पण काही वर्षांपूर्वी ते पत्नी व काव्या, श्रीयांश या दोन मुलांसह मूळ गाव चिमगाव येथे राहण्यास आले होते. रणजित मुरगूड येथील एका रुग्णालयात काम करत होते. रणजित यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबानुसार घरी कोणीतरी आलेल्या नातलगांनी आणलेल्या बेकरी उत्पादनांपैकी कप केक काव्या आणि श्रीयांश यांनी खाल्ले होते. त्यानंतर आम्हा तिघांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले. सोमवारी रणजित यांच्या पत्नी यांनी स्वतःवर प्राथमिक उपचार करून घेतले होते.

सोमवारी रात्री दोन्ही मुलांना त्रास होऊ लागल्याने त्यांना मुरगूडमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, तेथील डॉक्टरांनी काव्या हिला दाखल करून श्रीयांश याची तब्येत चांगली असल्याने घरी सोडले. काव्यावर मात्र तातडीने उपचार सुरू केले. मंगळवारी पहाटे श्रीयांश याची तब्येत अचानक बिघडली. त्याला तत्काळ मुरगूडच्या खासगी रुग्णालयात दाखल केले; पण सकाळी आठच्या सुमारास श्रीयांशचा मृत्यू झाला.

श्रीयांश याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करत असतानाच काव्याची तब्येत बिघडल्याची माहिती नातेवाइकांना समजली. चिमुरड्या श्रीयांशवर अंत्यसंस्कार करून कुटुंबीय तत्काळ मुरगूडमध्ये उपचार सुरू असणाऱ्या काव्याला घेऊन कोल्हापूरला गेले. लहान मुलांच्या खासगी रुग्णालयात तिला दाखल केले. काव्याची प्रकृती चिंताजनक होती. सायंकाळी सातच्या सुमारास काव्याचा मृत्यू झाला.

सकाळी भावाचा, सायंकाळी बहिणीचा मृत्यू

सोमवारी रात्री दोन्ही मुलांना त्रास होऊ लागल्याने त्यांना मुरगूडमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, तेथील डॉक्टरांनी काव्या हिला दाखल करून श्रीयांश याची तब्येत चांगली असल्याने घरी सोडले. काव्यावर मात्र तातडीने उपचार सुरू केले. मंगळवारी पहाटे श्रीयांश याची तब्येत अचानक बिघडली. सकाळी आठच्या सुमारास श्रीयांशचा मृत्यू झाला. श्रीयांश याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करत असतानाच काव्याची तब्येत बिघडल्याची माहिती नातेवाइकांना समजली. चिमुरड्या श्रीयांशवर अंत्यसंस्कार करून कुटुंबीय तत्काळ मुरगूडमध्ये उपचार सुरू असणाऱ्या काव्याला घेऊन कोल्हापूरला गेले. काव्याची प्रकृती चिंताजनक होती. सायंकाळी सातच्या सुमारास काव्याचा मृत्यू झाला.

विषबाधा नेमकी कशामुळे...


हसतखेळत असणारी दोन्ही मुले एका दिवसात डोळ्यांसमोर मृत्यूच्या खाईत गेल्याने आई-वडील आणि अन्य नातलगांनी काळीज पिळवटून टाकणारा हंबरडा फोडला होता. पॅकबंद केक खाऊन विषबाधा झाली की अन्य कोणत्या गोष्टीने याबाबत साशंकता व्यक्त होऊ लागल्याने काव्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. रात्री उशिरा सीपीआर रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणी करून मृतदेहाचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. या दोन चिमुरड्या भाऊ बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती परिसरात समजल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. अधिक तपास मुरगूड आणि लक्ष्मीपुरी पोलिस करत आहेत.

आइस केकची चर्चा होती पण ..

आइस केक खाल्ल्याची चर्चा सुरू आहे; पण तो साधा केक होता, अशी माहिती घटनास्थळी समजते. कोणत्या तरी नातलगाने तो केक घरी आणला, असे बोलले जात आहे. मुलांच्या आईने या संदर्भात कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. ती सध्या बोलण्याच्या स्थितीत नाही, असे ग्रामस्थ सांगतात. पोलिस चौकशीमध्ये केक कोणी आणून दिला? तो नातलग कोण? तो कोणत्या ब्रँडचा होता? याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.

मांडरे येथील आणखी दोघांचा मृत्यू, संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त

म्हालसवडे : मांडरे (ता. करवीर) येथे पंधरा दिवसांपूर्वी पाटील कुटुंबातील चौघाजणांना अन्नातून विषबाधा झाली होती. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना यातील पांडुरंग विठ्ठल पाटील (वय ६५) यांचा पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. मंगळवारी (दि. ३) रोजी कृष्णात पांडुरंग पाटील (३५) व रोहित पांडुरंग पाटील (३०) या दोघांचा मृत्यू झाला. याच कुटुंबातील प्रदीप पांडुरंग पाटील (२७) याच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद पोलिसात झाली असून, अधिक तपास सुरू आहे.

पाटील कुटुंबातील चौघांना दि. १५ नाेव्हेंबर रोजी अन्नातून विषबाधा झाली होती. सुरुवातीला त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने सर्वांनाच खासगी रुग्णालयात हलविले. उपचारादरम्यान पांडुरंग पाटील यांचा पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. यातील कृष्णात व रोहित यांचा मंगळवारी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
याच कुटुंबातील महिला गंगा कृष्णात पाटील (२५) व ओवी कृष्णात पाटील (३) यांना कोणतीही बाधा झाली नाही. ग्रामस्थांनी या कुटुंबातीलच महिलेवर पोलिसांसमोर घातपाताची शंका व्यक्त केली आहे.

मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मृत्यू पावलेल्या या दोन सख्ख्या भावांचे मृतदेह सीपीआर रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणले होते. संशयित महिलेला ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा ग्रामस्थांनी पोलिसांसमोर हट्ट धरला होता. रात्री उशिरा मृतदेहांवर गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.


विषबाधेतून मृत्यू पावलेल्या तिघांच्याही शवविच्छेदनातून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. याचा अहवाल प्राप्त होताच विषाचा कोणता प्रकार आहे हे पाहून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. सध्या विषबाधेची चौकशी सुरू आहे. - किशोर शिंदे, पोलिस निरीक्षक, करवीर पाेलिस ठाणे

Web Title: Four victims of food poisoning in Kolhapur district; A brother and sister died in Chimgaon and two died in Mandare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.