चार गावठी पिस्तुले जप्त-दोघा सराईत गुन्हेगारांना अटक : दोन लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 06:47 PM2019-04-06T18:47:26+5:302019-04-06T18:48:44+5:30
चंदगड तालुक्यातील बोंजुर्डी फाटा बस स्टॉप पसिरात देशी बनावटीचे गावठी पिस्तुले विक्रीसाठी आलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांना इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली. संशयित विकी
कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील बोंजुर्डी फाटा बस स्टॉप पसिरात देशी बनावटीचे गावठी पिस्तुले विक्रीसाठी आलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांना इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली. संशयित विकी धोंडीबा नाईक (वय २८, रा. आमरोळी, ता. चंदगड), सुनिल भिकाजी घाटगे (२६, रा. दुसरा बसस्टॉप, लक्षतीर्थ वसाहत) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून चार पिस्तुले, १ मॅगझीन, ८ जिवंत राऊंड असा सुमारे दोन लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
संशयितांकडे मिळालेली पिस्तुले कोठुन व कोणाकडून आणखी, बेकायदेशीर शस्त्र रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? तसेच संशयितांनी यापूर्वी कोणास शस्त्र विक्री केली आहे, याबाबत तपास सुरु असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आॅम अॅक्ट, अवैध दारु, जुगार, उघड्यावर दारु पिणे, हद्दपार, तडीपार, फरारी गुन्हेगार पकडणे आदी कारवाईसत्र सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेकडील पथके गस्त घालत असताना इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक रणजित पाटील यांना खबऱ्याकडून समजले की, बोंजुर्डी फाटा बसस्टॉप परिसरात दोन तरुण गावठी पिस्तुल व जिवंत राऊंड घेवून विक्रीसाठी येणार आहेत.
त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी सहकारी उपनिरीक्षक अमोल माळी, रणजित तिप्पे, सत्यराज घुले, महेश कोरे, वैभव दड्डीकर, शहनाज कनवाडे, विजय तळसकर, ज्ञानेश्वर बांगर, रविराज कोळी, राजु पट्टणकुडे, संजय इंगवले, फिरोज बेग, महेश खोत, रणजित पाटील, अजिंक्य घाटगे, संग्राम पाटील, सचिन बेंडखळे यांना घेवून बोंजुर्डी परिसरात सापळा रचला. संशयित विकी नाईक व सुनिल घाटगे हातामध्ये बॅग घेवून आले असता झडप टाकून त्यांना ताब्यात घेतले. बॅगची झडती घेतली असता चार पिस्तुले, एक मॅगझीन व आठ जिवंत काडतुसे मिळून आली. लोकसभा निवडणुक कालावधीत आजअखेर ८ बेकायदेशीर पिस्तुले आणि बंदूका जप्त केल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत आदी उपस्थित होते.
कारागृहात झाली दोस्ती
संशयित विकी नाईक याचेवर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात बेकायदेशीर पिस्तुल बाळगलेप्रकरणी २०१८ मध्ये गुन्हा दाखल आहे. संशयित सुनिल घाटगे याचेवर २०१३ मध्ये अनैतिक संबधातून लक्षतीर्थ वसाहतीमधील तरुणाचा खून केल्याचा गुन्हा दाखल आहे. या दोघांची कळंबा कारागृहात भेट होवून मैत्री झाली. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पिस्तुले तस्करीचा व्यवसाय करण्याचा प्लॅन आखला. त्यांनी बेळगाव येथून पिस्तुले आनलेची प्राथमिक माहिती आहे. पिस्तुल तस्करी मनिष नागरगोजी हा सध्या कारागृहात आहे. तो या दोघांचा मास्टरमार्इंड आहे काय? याबाबतही चौकशी सुरु आहे.