यंदा चारचाकी विक्रीचा वेग मंदावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:23 AM2021-04-10T04:23:43+5:302021-04-10T04:23:43+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लाॅकडाऊनमुळे चारचाकी व दुचाकी उत्पादनात घट झाली. त्याचा थेट परिणाम म्हणून मागणी असूनही विक्रीचा ...
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लाॅकडाऊनमुळे चारचाकी व दुचाकी उत्पादनात घट झाली. त्याचा थेट परिणाम म्हणून मागणी असूनही विक्रीचा वेग मंदावला आहे.
कोल्हापूरात गेल्या अर्थिक वर्षात ८ हजार ६०८ चारचाकी, तर ३८ हजार २९२ दुचाकी अशा ५० हजार ७६८ वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहनकडे झाली आहे. ही नाेंदणी २०१९-२० च्या तुलनेत कमी झाली आहे.
गेल्या वर्षी २३ मार्च २०२० ला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सर्वत्र देशभरात लाॅकडाऊन पुकारण्यात आला. त्यामुळे अत्यावश्यक सेवा सोडून सर्वच प्रकारचे उद्योग व्यवसाय बंद पडलले. त्याचा थेट परिणाम देशाच्या अर्थकारणावर पडला. त्यात कोल्हापूरकरांचे वाहन प्रेम देशभरातील वाहन उद्योग कंपन्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय मानले जाते. मागील वर्षी ८ हजार ६०८ इतक्या चारचाकी व ३८ हजार २९२ इतक्या दुचाकी कोल्हापूरच्या रस्त्यावर आल्या. यात कोरोनासह उत्पादक कंपन्यांना कच्चा माल पुरवणाऱ्या कंपन्याही त्या काळात बंद असल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला होता. ते भरून काढण्यासाठी जादा वेळ लागणार आहे. त्यामुळे एकूणच वाहनांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. सध्या बाजारात चारचाकीसह दुचाकीला मागणी आहे. मात्र, उत्पादक कंपन्यांकडून वाहनेच वितरकांना पुरेशा प्रमाणात पोहच न झाल्यामुळे काही प्रमाणात प्रतीक्षा यादी वाढू लागली आहे.
यंदा वाहन विक्री कमीच
२०१९-२० च्या अर्थिक वर्षात चारचाकी ११ हजार १५७ , तर ६४ हजार १८४ दुचाकी अशी ८१ हजार १३१ वाहनांची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली होती. ही यंदाच्या तुलनेत जादा होती.
कोट
मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे उत्पादक कंपन्या बंद ठेवण्यात आल्या होता. त्याचा परिणाम यंदाच्या वाहन विक्रीवर पडला आहे. सन २०१९-२० साली बी.एस.४ ची वाहनांचे उत्पादन एप्रिल २०२० मध्ये पूर्णत: बंद करण्यात आले. त्यापूर्वीच्या वाहनांची नोंदणी व विक्री वाढली होती.
-डाॅ. स्टीव्हन अल्वारीस, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर