महिला अधिकाऱ्यासह चौघांना अटक
By Admin | Published: June 14, 2015 01:53 AM2015-06-14T01:53:13+5:302015-06-14T01:53:13+5:30
रिलायन्स विमा पॉलिसी फसवणूक प्रकरण
कोल्हापूर : मृत व्यक्तींच्या नावे विमा पॉलिसी उतरवून लाखो रुपयांचा लाभ घेणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीच्या लक्ष्मीपुरी शाखेच्या महिला अधिकाऱ्यासह चौघांना शनिवारी अटक केली.
सेल्स मॅनेजर मधुरा शेखर जाधव (वय ३०, रा. राजारामपुरी, ८ वी गल्ली), संदीप पंडितराव सावंत (४०), एजंट अक्षय आनंदा चौगुले (२४, दोघे रा. जरगनगर), कल्पना शिवाजी सोनुले (४०, रा. कागल) अशी त्यांची नावे आहेत. संशयित डॉ. सागर पाटील (रा. साके, ता. कागल) बिनाभाई भट, सचिन बाबुजी मछले हे तिघेजण अद्याप पसार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
दोन वर्षांपूर्वी मृत झालेल्या नातेवाइकांना पैशाचे आमिष दाखवून, विश्वासात घेऊन मृतांच्या नावे रिलायन्स कंपनीची पॉलिसी उतरवून लाखो रुपयांचा लाभ संशयितांनी घेतल्याचे पुण्यातील डी. एम. आर. इन्व्हेस्टिगेशन या कंपनीने चौकशी केल्यानंतर निष्पन्न झाले होते. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात सतीश नारे यांनी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी रिलायन्स विमा कंपनीच्या लक्ष्मीपुरी शाखेच्या सेल्स मॅनेजर मधुरा जाधव, संदीप सावंत यांच्यासह एजंट अक्षय चौगुले व कल्पना सोनुले यांना चौकशीसाठी शनिवारी सकाळी पोलीस ठाण्यात बोलवून घेतले. प्राथमिक चौकशीमध्ये हे चौघेजण दोषी असल्याचे स्पष्ट होताच त्यांना अटक केली.
दया करा साहेब
रिलायन्सच्या सेल्स मॅनेजर मधुरा जाधव यांच्याकडे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी चौकशी केली असता त्यात त्या दोषी असल्याचे स्पष्ट होताच त्यांना अटक करण्याचे आदेश ठाणे अंमलदारांना दिले. अटकेच्या भीतीने जाधव यांनी दया करा साहेब, लहान मुलगी आहे. आज घरी पाठवा, मी उद्या स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर राहते, अशी विनवणी केली. त्यावर गोडसे यांनी महिला पोलिसांना बोलवून त्यांना घेऊन जाण्यास सांगितले.