चार वर्षांत १०६८ मुले ‘लाईन’वर
By admin | Published: May 27, 2015 12:27 AM2015-05-27T00:27:11+5:302015-05-27T00:59:32+5:30
चाईल्ड लाईन संस्थेचा आधार : जनजागृतीमुळे हेल्पलाईनवर तक्रारींच्या प्रमाणात वाढ
इंदुमती गणेश -कोल्हापूर -बालपण हे फुलपाखरासारखे असते, कधी या वेलीवर तर कधी त्या. पण, अनेकांचे बालपण काट्यांनी भरलेली असते...अशा बालकांचे बालपण जपण्यासाठी केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या चाईल्ड लाईन संस्थेने चार वर्षांत कोल्हापुरातील १०६८ बालकांची विविध प्रकारची प्रकरणे सकारात्मकतेने सोडविली आहेत. त्यात सर्वाधिक संख्या मुलांना विविध प्रकारची मदत, समुपदेशन, बालभिकारी, बालकामगारांची आहे.
अनेकदा कौटुंबिक कलह, शारीरिक-मानसिक शोषण, अशा विविध कारणांनी बालवयातच भरकटलेल्या मुला-मुलींचे बालपण जपण्यासाठी ‘१०९८’ ही हेल्पलाईन केंद्र सरकारने सुरू केली आहे. संकटात असलेली मुले किंवा आसपासचे नागरिक या टोल फ्री क्रमांकावर फोन करून मुलांबद्दलची तक्रार किंवा माहिती देऊ शकतात. ही माहिती मिळाली की ‘चाईल्ड लाईन’च्यावतीने त्या-त्या भागातील शहरातील, जिल्हा-तालुक्याच्या ठिकाणच्या समन्वयकाला तातडीने कळविले जाते. तासाभराच्या आत संस्थेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचून त्या बालकापर्यंत पोहोचतात.
कोल्हापुरात ‘चाईल्ड लाईन’ची शाखा सुरू होऊन नुकतीच चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या चार वर्षांत संस्थेने १०६८ बालकांचे प्रश्न यशस्वीरीत्या सोडविले आहे. काही दिवसांपूर्वी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात भीक मागणाऱ्या मुलांनाही सोडविण्यात आले होते. बालविवाह रोखण्यातही संस्थेला यश आले आहे. संस्थेने सर्वाधिक मदत एचआयव्हीबाधीत विद्यार्थ्यांना पोषण आहार व अन्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांची केली आहे. त्यापाठोपाठ बालकामगार बालभिकारींना मुक्त करून त्यांच्या शिक्षणाची सोय करण्यात आली आहे.
दोन वर्षांपूर्वींपर्यंत लहान मुला-मुलींचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘चाईल्ड लाईन’सारखी संस्था काम करते, हे मुलांना व नागरिकांना माहितच नव्हते. आता जनजागृती झाल्यामुळे तक्रारींचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे एखाद्या बालकांवर अन्याय होत असेल, किंवा त्याला आधाराची गरज असेल, तर फक्त एक फोन करा तुमचे नाव गुप्त ठेवले जाईल.
- अनुजा खुरंदळ, केंद्र समन्वयक