किटवाड धरणात बुडून चार तरुणींचा मृत्यू, एकीला वाचविण्यात यश, कोल्हापुरातील चंदगड येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 04:09 PM2022-11-26T16:09:46+5:302022-11-26T16:15:21+5:30
बचावलेल्या तरुणीची प्रकृती गंभीर
निंगाप्पा बोकडे
चंदगड : बेळगाव व चंदगड तालुक्याच्या सीमेवरील बेकिनकेरे (ता. बेळगाव) येथून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या किटवाड (ता. चंदगड) येथे लघुपाटबंधारे धरणाच्या धबधब्याच्या ठिकाणी खोल खड्ड्यात पडून बेळगाव येथील चार मुलींचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एका तरुणीला वाचवण्यात किटवाड येथील तीन तरुणांना यश आले. ही दुर्घटना आज, शनिवार (दि. २६) सकाळच्या सुमारास घडली. याघटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे.
आशिया मुजावर (वय-१७, रा. उज्ज्वलनगर), कुडशिया हासम पटेल (२०), रुक्शार भिस्ती (२०, दोघी रा. अनगोळ) व तस्मिया (२०, रा. झटपट कॉलनी) अशी मृत्यू तरुणींची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, किटवाड येथे दोन धरणे आहेत. यातील एका धरणावर धबधब्याचे पाणी पडून तयार झालेल्या खड्ड्यात या तरुणी आंघोळीसाठी पाण्यात उतरल्या होत्या. पहिली तरुणी खड्ड्यात पडल्याने तिला वाचवण्यासाठी गेलेल्या पाचही तरुणी पाण्यात बुडाल्या. यामधील चार जणींचा जागीच मृत्यू झाला. तर एकीला वाजवण्यात यश आले. बचावलेल्या तरुणीची प्रकृती गंभीर असल्याने तिला उपचारासाठी बेळगाव येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, तातडीने किटवाड येथील महेश हेब्बाळकर, विजय लाड, आकाश पाटील तरुणांनी धाव घेऊन पाण्याच्या खड्ड्यातून पाचही तरुणींना बाहेर काढले. शनिवारी सकाळीच बेळगाव येथील अनेक कुटुंबे मिळून असे चाळीस जण धरणाच्या ठिकाणी सहलीसाठी आले होते. त्यावेळी ही घटना घडल्याने बघता बघता परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती.