चौदा ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज?

By admin | Published: June 29, 2015 12:20 AM2015-06-29T00:20:38+5:302015-06-29T00:20:38+5:30

जत तालुका : निवडणुका लक्षवेधी होण्याची शक्यता, मोर्चेबांधणीस वेग

Fourteen Gram Panchayats are Mahilaraj? | चौदा ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज?

चौदा ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज?

Next

संख : जत तालुक्यातील पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये १४ ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज येणार आहे. निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी गावपातळीवरील कार्यकर्ते आतापासूनच कामाला लागले आहेत. तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या होणाऱ्या निवडणुका लक्षवेधी होणार आहे. तालुक्यात लोकसभा आणि विधानसभेपेक्षाही ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीने होणार आहेत. सध्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असून प्रभागनिहाय बैठका सुरू झाल्या आहेत.
तालुक्यातील भिवर्गी, सावडवाडी, गुड्डापूर, गुगवाड, मोरबगी, सनमडी, शेगाव, सिंगनहळ्ळी, सोनलगी, उटगी, वळसंग, उंटवाडी, अंकलगी, घोलेश्वर, करेवाडी (तिकोंडी), कुडणूर, कुलाळवाडी, निगडी बु।।, शेड्याळ, लमाणतांडा (उटगी), तिकोंडी, टोणेवाडी, येळदरी, सिद्धनाथ, जालिहाळ खुर्द, लमाणतांडा (दरीबडची), मेंढेगिरी, उमराणी, अंकले, डोर्ली या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.
शेगाव, मेंढेगिरी, टोणेवाडी, सोनलगी, घोलेश्वर, सिंगनहळ्ळी, धावडवाडी, टोणेवाडी, मोरबगी, कुलाळवाडी या गावांच्या निवडणुका चुरशीने होणार आहेत. येथील सरपंचपद सर्वसाधारण जागेसाठी आहे.
मागील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला १९ ग्रामपंचायतींमध्ये मताधिक्य मिळाले होते, तर राष्ट्रीय कॉँग्रेसला ८ ग्रामपंचायतींमध्ये, राष्ट्रवादी कॉँग्रेसला ३ ग्रामपंचायतींमध्ये मताधिक्य मिळाले होते. विधानसभा निवडणुकीनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बॅँकेमध्ये कॉँग्रेसचे विक्रम सावंत विजय झाले आहेत. आ. विलासराव जगताप यांच्या गटातून सुरेश शिंदे, बसवराज पाटील (जनसुराज्य) बाहेर पडले आहेत. त्यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची राहणार आहे.(वार्ताहर)

बिनविरोधची परंपरा राखणार काय?
पूर्व भागातील जालिहाळ खुर्द, मोरबगी, कुलाळवाडी, सोनलगी, लमाणतांडा (दरीबडची) या ग्रामपंचायतींच्या प्रत्येक पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध होतात. यापैकी जालिहाळ खुर्द या ग्रामपंचायतीची निवडणूक स्थापना झाल्यापासून सलग दहावेळा बिनविरोध झाली आहे. यावेळी अनुसूचित जातीसाठी सरपंचपद आरक्षित झाले आहे. यावेळीही निवडणूक बिनविरोध होणार आहे. कुलाळवाडी, लमाणतांडा (द. ब.), करेवाडी (तिकोंडी) ग्रामपंचायती एकवेळ पंचवार्षिक निवडणुकीचा अपवाद वगळता बिनविरोध झाल्या आहेत. याहीवर्षी बिनविरोधची परंपरा राखणार, की निवडणुका होणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

सरपंच आरक्षणाचा घोळ
सरपंच आरक्षणामध्ये गुड्डापूर ग्रामपंचायतीचे अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाले आहे. पण अनुसूचित जमातीची लोकसंख्याच नाही. त्यामुळे सरपंचपद रिक्त राहणार आहे. उपसरपंच कारभार पाहणार आहेत. अंकलगी सरपंच सलग दुसऱ्यावेळी इतर मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव झाले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची पुनरावृत्ती होऊन जनसुराज्य, वसंतदादा आघाडीचे सुरेश शिंदे व राष्ट्रीय कॉँग्रेस एकत्र येऊन लढविणार काय, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Fourteen Gram Panchayats are Mahilaraj?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.