भारती डोंगळेसह चौदा जण अवैधच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:25 AM2021-04-20T04:25:18+5:302021-04-20T04:25:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकूळ’च्या निवडणुकीत पोटनियमाचे पालन न केल्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भारती विजयसिंह डोंगळे यांच्यासह चौदा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकूळ’च्या निवडणुकीत पोटनियमाचे पालन न केल्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भारती विजयसिंह डोंगळे यांच्यासह चौदा जणांचे अवैध ठरवलेले अर्ज विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनीही अवैधच केले. या सर्वांनी घेतलेल्या हरकती फेटाळल्याने त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग बंद झाला आहे.
‘गोकूळ’च्या २१ जागांसाठी ४८२ अर्ज दाखल झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, सहायक निवडणूक अधिकारी शरद पाटील व डॉ. गजेंद्र देशमुख यांनी छाननीमध्ये ७६ जणाचे अर्ज अवैध ठरविले. यापैकी ३५ जणांनी नावडकर यांच्याकडे हरकत घेतली मात्र त्यांनी सुनावणी घेऊन फेटाळली. यातील भारती विजयसिंह डोंगळे, अजित पाटील, गंगाधर व्हसकुटे, यशवंत नांदेकर यांच्यासह चौदा जणांनी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांच्याकडे दाद मागितली. यावर गुरुवारी (दि. १५) सुनावणी घेण्यात आली, त्याचा निकाल सोमवारी देण्यात आला. निवडणूक निर्णय वैभव नावडकर यांनी दिलेला निकाल कायम ठेवत चौदा जणांची हरकत फेटाळण्यात आली.
त्यामुळे संबंधितांचा निवडणूक लढविण्याच मार्ग बंद झाला आहे. विभागीय उपनिबंधकांच्या निर्णयाविरोधात आता थेट उच्च न्यायालयातच दाद मागता येते. मात्र निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याने येथेपर्यंत जाण्याची शक्यता धुसर आहे.