तिघा चोरट्यांकडून चौदा दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:20 AM2021-01-15T04:20:02+5:302021-01-15T04:20:02+5:30
कोल्हापूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तिघा चोरट्यांकडून चार लाख किमतीच्या १४ दुचाकी जप्त केल्या. यात रमेश लगमान्ना ...
कोल्हापूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तिघा चोरट्यांकडून चार लाख किमतीच्या १४ दुचाकी जप्त केल्या. यात रमेश लगमान्ना पाटील (वय ३१, रा.नंदनवाड, ता.गडहिंग्लज) , जावेद नजीर सय्यद (वय २१, रा. हेरे, ता.चंदगड) , शिवाजी ऊर्फ सचिन कुमार चिखलबी (वय २८, रा. सदर बाजार) या संशयितांना अटक करण्यात आली.
शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले व त्यांच्या पथकाने महामार्गासह सर्वत्र पाळत ठेवली होती. यात उजळाईवाडी येथे रमेश पाटील व जावेद या संशयितांना अटक करून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता ९ दुचाकी हस्तगत झाल्या. त्यानंतर विचारे माळ कदमवाडी-कसबा बावडा मार्गावर पाळत ठेवण्यात आली. त्यात शिवाजी चिखलबी यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून ५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. नोव्हेंबर २०२० पासून आजपर्यंत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने १३ लाख ३५ हजार किमतीच्या ५९ दुचाकी जप्त केल्या. या कारवाईत उपनिरीक्षक विनायक सपाटे, वसंत पिंगळे, पांडुरंग पाटील, विठ्ठल मेणीकरी, तुकाराम राजगिरे, आसिफ कलायगार, सुरेश पाटील, हिंदुराव केसरे, वैभव पाटील, संजय पडवळ, सोमराव पाटील, संतोष पाटील यांनी सहभाग घेतला.