‘कॅसिनो’वर ‘सम्राट’ होण्यासाठी चौघांत वर्चस्ववाद : राजकीय, खाकीतील नातलगांचे सुरक्षा कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:23 AM2018-05-11T01:23:03+5:302018-05-11T01:23:03+5:30
कोल्हापूर : आॅनलाईन ‘कॅसिनो’ जुगारातून कोल्हापुरातील बुकी, लॉटरीचालक व्यवसायातील चौघेजण संपूर्ण जिल्ह्यातील बेकायदेशीर व्यवसायांचे ‘सम्राट’ होण्याची स्वप्ने पाहत आहेत. लक्ष्मीपुरी, शिवाजी पेठ, रविवार पेठ अशी ही ‘कॅसिनो’चालकांच्या हालचालींची मुख्य केंद्रे आहेत. ‘कॅसिनो’च्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात आपल्या बेकायदेशीर व्यवसायाची छाप पाडण्यासाठी या चौघांत वर्चस्ववाद सुरू असून, तो उफाळून येण्याची शक्यता आहे. या चौघाही बुकी व लॉटरीचालकांना राजकीय आणि पोलीस खात्यातील वरदहस्त लाभल्याने ‘कॅसिनो’ जिल्ह्यात दिवसेंदिवस फोफावतच निघाला आहे.
संपूर्ण जिल्ह्यात या आॅनलाईन कॅसिनो जुगाराने पाय पसरायला सुरुवात केली आहे. या ‘विन आणि किंग गेम’च्या नावाखाली आॅनलाईन कॅसिनोमधील सॉफ्टवेअरच्या करामतीवर जास्तीत जास्त बुकी, लॉटरीचालक मालामाल होतात. लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर येथे प्रथम लॉटरी सेंटरवरून याची मुहूर्तमेढ रोवली. कोल्हापूरसह इचलकरंजी हे कॅसिनो जुगाराचे मुख्य केंद्र बनले. लक्ष्मीपुरीपाठोपाठ रविवार पेठेतील बुकी व्यावसायिकानेही आपल्या आत्येभावाच्या मदतीने गेल्या वर्षी या जुगारात पदार्पण केले.
‘कॅसिनो’ला कोकणातील नात्यातील खाकी महिला अधिकाऱ्याचा आश्रय मिळाला. पुढे भागीदारीच्या पैशावरून एका चित्रमंदिराच्या चौकात दोघांत हाणामारी झाली. त्यांचे कॅसिनो कसबा बावडा, शिंगोशी मार्केट (मिरजकर तिकटी) येथे सुरू आहेत.
कोल्हापुरात पडद्यामागे बुकीची भूमिका बजावणाºयानेही नात्यातील राजकीय लाभ उठवीत या ‘कॅसिनो’त ‘सम्राट’ होण्याचे स्वप्न पाहिले. त्याने इचलकरंजीतही नात्यातून राजकीय दबाव आणून पारंपरिक बुकीला जेरीस आणले. त्या बुकीच्या ‘कॅसिनो’ सेंटरवर आपला कब्जा केला. त्यातून राजकीय आश्रयाखाली हा ‘कॅसिनो’ जुगार फोफावत आहे.
महाविद्यालयीन युवक लक्ष्य
महाविद्यालयांचे चौक हेच या बुकींचे ‘कॅसिनो’साठी योग्य ठिकाण असते. महाविद्यालयीन युवकांना हेरून त्यांना त्यांनी ‘आॅनलाईन गेम्स’च्या मोहजालात ओढले आहे. त्यामुळे महाविद्यालयीन युवकांसह उद्योजक आणि नोकरदारही या ‘कॅसिनो’त अडकले आहेत.
कॅसिनोची केंद्रे व ठिकाणे
कोल्हापुरात फोर्ड कॉर्नर (लक्ष्मीपुरी) येथे लॉटरीचालकाचे मुख्य केंद्र असून, तो शहरातील फोर्ड कॉर्नर, मध्यवर्ती बसस्थानक, कागल येथील जुगारावर नियंत्रण ठेवत आहे.
स्टर्लिंग टॉवरशेजारी एका ‘टपाल’ व्यवसायाठिकाणी केंद्र असून, तिथून कसबा बावडा, शिंगोशी मार्केट, मध्यवर्ती बसस्थानक येथील कॅसिनो जुगारावर नियंत्रण ठेवले जाते.
व्हीनस कॉर्नर येथून मध्यवर्ती बसस्थानक आणि इचलकरंजी, जोतिबा डोंगर (वाडी रत्नागिरी), अर्जुननगर (निपाणी) येथील ‘कॅसिनो’वर नजर ठेवली जाते.
हातकणंगले, कुरुंदवाड, शिरोळ, वडगाव येथेही कॅसिनोची स्वतंत्र केंद्रे आहेत.
३५ वरून ३५००
‘कॅसिनो’त शिरकाव केलेल्या एका कॅसिनोचालकाने अवघ्या वर्षात दुचाकी बदलून आलिशान चारचाकी घेतल्याचे साऱ्यांच्या नजरेत भरत आहे. त्याने वाहनाबरोबरच ३५ वरून ३५०० अशा क्रमांकातही आघाडी घेतल्याने तो या क्रमांकावरूनही व्यवसायात प्रसिद्ध झाला आहे.
‘कॅसिनो’चे स्वतंत्र अॅप
राजकीय नात्याचा फायदा उठवीत ‘त्या’ने इचलकरंजीत कॅसिनोचे स्वतंत्र अॅप तयार करून अवघ्या दीड महिन्यात लाखो रुपयांची उलाढाल केली आहे.
त्यातून अनेकजण कंगाल बनले आहेत. त्याचे कोल्हापुरात व्हीनस कॉर्नर येथेही केंद्र आहे.