चौवीस तास नाकाबंदी, वाहनांची कसून तपासणी-बनावट नोटा, देशी-विदेशी मद्य, हत्यारे तस्करींवर करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:40 PM2019-04-03T12:40:14+5:302019-04-03T12:41:32+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनावट चलनी नोटा, देशी-विदेशी मद्य व हत्यारे, आदींची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या पार्श्वभूमिवर खबरदारी म्हणून शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनावट चलनी नोटा, देशी-विदेशी मद्य व हत्यारे, आदींची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या पार्श्वभूमिवर खबरदारी म्हणून शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील नाक्यासह चौका-चौकांत चौवीस तास कडक नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. प्रत्येक नाक्यावर व चौकात पोलिसांचे पथक खडा पहारा देत आहे.
लोकसभा निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने जिल्'ात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी सर्वत्र नाकाबंदी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले आहेत. त्यानुसार शहरातील शिरोली, तावडे हॉटेल, कावळा नाका, शाहू नाका, शिवाजी पूल, शिये, कसबा बावडा, दसरा चौक, कळंबा नाका, वाशी नाका, सायबर चौक, फुलेवाडी, उमा टॉकीज, गंगावेश, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, माउलीचा पुतळा, मध्यवर्ती बसस्थानक, आदी ठिकाणी पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. लायसेन्स, वाहनांची कागदपत्रेतसेच वाहनातील प्रत्येक बॅगेची कसून तपासणी केली जात आहे. त्या वाहनातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींची नावेही नोंद केली जात आहेत. हत्यारे, मद्याची तस्करी, बनावट नोटा मिळून आल्यास जाग्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
महिलेला मारहाण
कोल्हापूर : सत्य प्रकाश सेवा मंडळ टिंबर मार्केट येथे किरकोळ वादातून महिलेच्या डोक्यात स्टिलचा ग्लॉस मारुन जखमी केले. शोभा गणपत लोखंडे (वय ३६, रा. गवत मंडई, टिंबर मार्केट) या जखमी झाल्या. त्यांनी संशयित विद्या दिपक कांबळे हिला तुझा भाऊ पिंटू माझ्या मुलीला त्रास देतो, त्याला ताकीद दिली आहे असे सांगत असताना रागाने स्टिलचा ग्लॉस फेकून मारला. जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
न्यायालय परिसरात धक्काबुक्की
कोल्हापूर : कौटूंबिक न्यायालय परिसरात मुलीच्या भेटीवरुन वाद होवून वृध्द दाम्पत्यास शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोघा भावांवर लक्ष्मीपूरी पोलीसांत मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित सत्वशिल बाळासाहेब जाचक (वय ४२), त्याचा भाऊ संग्राम (४०, दोघे रा. अशोकनगर, भिगवन रोड, बारामती) अशी त्यांची नावे आहेत. फिर्यादी जगन्नाथ बाबुराव पाटणकर (७२, रा. नलवडे कॉलनी, सम्राटनगर) हे पत्नी मंगल असे मिळून कौटूंबिक न्यायालयात तारीख असल्याने मंगळवारी आले होते. यावेळी संशयितांनी त्यांना पाहून मुलीची भेट देत नाही, तुला काय करायचे ते कर असे म्हणून शिवीगाळ करुन पाटणकर दाम्पत्यास धककाबुक्की केली. यावेळी जगन्नाथ पाटणकर यांच्या उजव्या हातावर कटरने वार केला.
तीन दूचाकी चोरी
कोल्हापूर : रावणेश्वर मंदीर समोर शिवाजी स्टेडीयम आणि शाहु कलॉथ मार्केट येथे पार्किग केलेल्या तीन दूचाकी चोरट्याने लंपास केल्या. याप्रकरणी हिमतखान महम्मद हनीफ पठाण (५३, रा. नळभाग, सांगली), प्रकाश रामचंद्र माने (७०, रा. वारणा कॉलनी, कोल्हापूर), दत्ता लक्ष्मण शारबिद्रे (३०, रा. यादवनगर) यांनी लक्ष्मीपूरी व जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दिली.