चौपदरीकरणाच्या कामात विघ्नच विघ्न!
By admin | Published: June 17, 2016 09:47 PM2016-06-17T21:47:59+5:302016-06-17T23:52:51+5:30
पाच टप्प्यात काम : रत्नागिरी-कोल्हापूर प्रकल्प प्राधिकरणकडे
प्रकाश वराडकर --- रत्नागिरी -मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरू असतानाच भूसंपादनाच्या कामात विघ्नच विघ्न समोर येत आहेत. त्यातून वाट काढण्याचे जोरदार प्रयत्न राष्ट्रीय महामार्गच्या रत्नागिरी विभागाकडून सुरू आहेत. कशेळी ते झाराप या मार्गावर पाच टप्प्यात चौपदरीकरणाचे काम होणार असून, त्यातील तीन टप्प्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कामांचे कार्यादेश देणे बाकी असून, उर्वरित दोन टप्प्यांची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे.
मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणात कशेळी ते झाराप (गोवा) या मार्गावर पाच टप्प्यात काम होणार आहे. त्यातील खवटी ते परशुरामघाट (१६१.६०० ते २०५.४०० किलोमीटर), आरवली ते तळेकांटे (२४१.२०० ते २८१.२०० किलोमीटर) व तळेकांटे ते वाकेड (लांजा) (२८१.२०० ते ३३२.२०० किलोमीटर) या तीनही टप्प्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कामांचे कार्यादेश निघणे बाकी आहे. त्यानंतर या तीनही टप्प्यांची कामे सुरू होणार आहेत. मात्र, जिल्ह्यातील या टप्प्यांमध्ये समाविष्ट नसलेल्या मार्गावरील काही अंतरात अनेक अडचणींचा सामना महामार्ग विभागाला करावा लागत आहे. त्यामध्ये बाजारपेठा, घरे, प्रार्थनास्थळे यांचा समावेश आहे. बाजारपेठांमधून चौपदरीकरणाचे काम पुढे कसे न्यावे, याबाबतचे आव्हान अद्याप कायम आहे.
तीन टप्प्यांतील कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी पेण विभागाकडे असलेल्या कशेळी ते खवटी व रत्नागिरी विभागाकडे असलेले वाकेड ते झाराप या दोन टप्प्यांतील निविदा प्रक्रिया अद्याप सुरू आहे. ही प्रक्रियाही लवकरच पूर्ण होईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभाग सुत्रांकडून सांगण्यात आले.
पनवेल - महाड - पणजी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ (जुना १७) असून, रस्ते वाहतूूक व महामार्ग मंत्रालयाने या मार्गापैकी इंदापूर ते झाराप या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३६६.१७० किलोमीटर्स भागाच्या चौपदरीकरण कामाला २१ जून २०१३, ४ जून २०१३ व ६ जून २०१३ अन्वये मान्यता दिली होती.
गेल्या दोन दशकांपासून चौपदरीकरणाची मागणी केली जात होती. या काळात मुंबई - गोवा महामार्गावर अपघातांची श्रुंखलाच सुरू आहे. अनेक अपघात होऊन त्यात हजारो लोक मृत्यूमुखी पडले आहेत, तर कित्येक लोकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या महामार्गाला डेड ट्रॅक म्हणूनही ओळखले जाते. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पाला मंजुरी दिली. सुमारे ५ हजार कोटींपेक्षा अधिक खर्च या प्रकल्पासाठी येणार आहे.
दोन टप्पे बाकी : तीन टप्प्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण
रत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर महामार्ग चौपदरीकरणाचे काम नॅशनल हायवे अथॉरिटी आॅफ इंडिया अर्थात एनएचएआयकडे सोपविण्यात आले आहे. मात्र, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडेच असून, त्याबाबत या विभागाने सज्जता केली आहे.