चौथरा जाग्यावर; टाकी गायब
By admin | Published: January 29, 2015 12:27 AM2015-01-29T00:27:02+5:302015-01-29T00:32:54+5:30
सातवे नळपाणी योजनेत गैरकारभार : कोटींवर खर्च करून शिंदेवाडी, वाळकेवाडीत पाणीटंचाई
पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील जलस्वराज्य योजनेंतर्गत असलेल्या पाणीपुरवठा योजनेत गैरकारभार झाल्याने ८ जानेवारी रोजी तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकासह १२ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. या योजनेत ‘ढपला’ कुणी, किती मारला याची चर्चा आता सुरू आहे. राजकीय वरदहस्त, अधिकाऱ्यांचे संगनमत यामुळे तक्रारीनंतर थेट कारवाईकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष, तपासणीत निदर्शनास आलेला गैरकारभार, झालेली कारवाई यांवर प्रकाशझोत टाकणारी मालिका आजपासून...
भीमगोंडा देसाई - कोल्हापूर
जलस्वराज्य योजनेंतर्गत सातवे (ता. पन्हाळा) येथील नळपाणी पुरवठा योजनेतील गैरव्यवहार चव्हाट्यावर आला असून ढपलामारीची चर्चा सुरू झाली आहे. वाळकेवाडीत चौथरा बांधला आहे; मात्र पाण्याची टाकी गायब आहे. तत्कालीन ग्रामपंचायत कारभाऱ्यांनी ‘अर्थपूर्ण पाणी’ मुरविले, हे चौकशीत उघड झाले आहे.
जागतीक बँकेच्या अर्थसाहाय्याने सातवे गावासाठी सन २००६-०७ साली जलस्वराज्य योजनेतून एक कोटी ११ लाख रुपये मंजूर झाले. ग्रामपंचायत व ग्रामीण पाणीपुरवठा, महिला सबलीकरण, सामाजिक लेखापरीक्षण या समितीतर्फे योजनेची अंमलबजावणी झाली. दहा टक्के लोकवर्गणीही संकलित केली. कामाचा ठेका कऱ्हाडचे रामचंद्र पोवार यांनी घेतला. ठेका घेतल्यानंतर दोन महिन्यांनी रामचंद्र यांचा मृत्यू झाला. त्यानंतर ठेकेदारी सांभाळत कारभाऱ्यांनी योजना पूर्ण केली.
योजनेसाठी गावसभा होऊन निर्णय होणे अपेक्षित असताना गावसभा कागदावर राहिली आणि कारभाऱ्यांनी डल्ला मारला. त्यामुळे योजनेत त्रुटी राहिल्या.वाड्या, वस्त्यांमध्ये पाणी जाऊन पडले नाही; त्यामुळे कोटींपेक्षा अधिक खर्च झालेला पैसा मुरल्याची शंका येऊ लागली. त्यातूनच रहिवासी उत्तम रंगराव नंदूरकर यांनी तीन वर्षांपूर्वी पहिली तक्रार केली.
कारवाईसाठी वेळोवळी वरिष्ठांकडेही साकडे घातले. २५ फेब्रुवारी २०१३ रोजी उत्तम यांनी पुणे विभागाचे आयुक्त यांच्याकडे तक्रारीचे निवेदन दिले. सातवे ग्रामपंचायत हद्दीतील वाळकेवाडी, शिंदेवाडीला योजना सुरू झाल्यापासून पाणीपुरवठा झालेला नाही. काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. योजनेसंबंधी कागदपत्रे ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध नाहीत. लोकवर्गणीची खोटी आणि बोगस नावे दाखविली आहेत. पावत्या दिलेल्या नाहीत. वाड्या-वस्तीला पाणी पोहोचले नसताही योजनेचे अंतिम बिल काढले आहे. यामध्ये मोठा गैरव्यवहार झालेला आहे. याची खातेनिहाय सखोल चौकशी करावी, असे त्यांनी निवेदनात म्हटले.
तरीही थेट कारवाई न झाल्याने त्यांनी वारंवार चिकाटीने पाठपुरावा सुरूच ठेवला. उत्तम यांनी १५ आॅगस्ट २०१४ रोजी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, यासाठी उपोषणाचा इशारा देऊन जोरदार रेटा लावला. परिणामी, प्रकरण आता शेकणार म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे धाडस केले. पन्हाळा पंचायत समितीच्या सौ. एन. आर. परीट, शाहूवाडी-पन्हाळ्याचे उपअभियंता जगदीश काटकर यांनी चौकशी केली. यात योजना पूर्ण झाल्यानंतरही बाळकेवाडी, शिंदेवाडी येथील सर्व रहिवाशांना पाणी मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (क्रमश:)
तीन वर्षांपूर्वी तक्रार
ग्रामसभेत वेळोवेळी निर्णय घेऊन पारदर्शकपणे अंमलबजावणी अपेक्षित होते; परंतु, गावसभा कागदावर आणि कारभारी शिरजोर होऊन डल्ला मारला. त्यामुळे योजनेत अनेक त्रुटी राहिल्या. वाड्या, वस्त्यांमध्ये पाणी जाऊन पडले नाही; त्यामुळे कोटींपेक्षा अधिक खर्च झालेला पैसा मुरल्याची शंका येऊ लागली. त्यातूनच रहिवासी उत्तम रंगराव नंदूरकर यांनी तीन वर्षांपूर्वी पहिली तक्रार केली.