दहा वर्षाच्या कष्टाने फोंड्या माळावर फुलविली वनराई
By admin | Published: June 5, 2014 01:25 AM2014-06-05T01:25:35+5:302014-06-05T01:26:05+5:30
तामगावमधील तेंडुलकर कुटुंबीयांची किमया : पर्यावरण रक्षणाचा दिला कृतीतून संदेश; पर्यावरणदिनी साजरा करतात झाडांचा वाढदिवस
संतोष मिठारी ल्ल कोल्हापूर सभोवती असलेली औद्योगिक वसाहत, खडकाळ जमीन, पाण्याचा अभाव, अशा परिस्थितीत तामगाव (ता. करवीर) येथील नारायण नगरमध्ये तेंडुलकर कुटुंबीयांनी चिकाटी आणि जिद्दीने दहा वर्षांच्या प्रयत्नातून वनराई फुलविली आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे. मूळचे कोकणातील तेंडुलकर कुटुंबीयांनी दहा वर्षांपूर्वी जेरबेराचे ग्रीन हाऊस करण्याच्या उद्देशाने उजळाईवाडी- नेर्ली मार्गावरील या नारायण नगरमध्ये १६ गुंठे जमीन खरेदी केली. हा परिसर म्हणजे फोंडा माळ होता. खडकाळ जमीन, पाण्याचा अभाव होता. हे वास्तव समजल्यानंतर सुधा आणि सुरेश तेंडुलकर यांनी ग्रीन हाऊसचा निर्णय रद्द करून राहण्यासाठी बंगला बांधण्यासह या माळावर वनराई फुलविण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी तयारी सुरू केली. त्यांनी ४० ते ४५ ट्रॉली लाल माती आणून याठिकाणी पसरली. बोअर मारली. फुले, फळे विभागातील झाडे त्यांनी या ठिकाणी लावली. त्यासाठी त्यांनी जागेचा एकही कोपरा शिल्लक ठेवला नाही. सध्या नारळ, आंबा, चिकू, जांभूळ, जाम, आवळा, चिंच, लिंबू, पेरू, चाफा, जास्वंदी, मोगरा, मधुमती, हिरवा व सोनचाफा, जास्वंदी अशा विविध प्रकारांतील सुमारे २५० हून अधिक झाडांनी त्यांची वनराई फुलली आहे. चिमणी, भारद्वाज अशा विविध पक्षांचे आश्रयस्थान बनली आहे. या झाडांची खत-पाणी, देखभाल, निगा राखण्याचे काम सुधा करतात. यात त्यांना पती सुरेश, मुलगा संकेत, नातेवाईक अजित देशपांडे हे मदत करतात. उजळाईवाडी-नेर्ली मार्गावरून जाताना अनेकजण तेंडुलकर कुटुंबीयांनी फुलविलेली वनराई पाहून माहिती घेण्यासाठी थांबतात. त्यांचा आदर्श घेवून या परिसरातील काही उद्योजकांनीदेखील आपले वर्कशॉप, बंगल्याच्या आवारात झाडे लावली आहेत.