आजऱ्याचा सुवासिक घनसाळ परदेशात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:20 AM2021-01-02T04:20:05+5:302021-01-02T04:20:05+5:30

* घनसाळचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्याचे नियोजन सदाशिव मोरे। आजरा ग्राहकांच्या मनावर आपल्या सुवासिक व चवदारपणाने अधिराज्य गाजविलेला ‘आजरा ...

The fragrant scent of the sick will go abroad | आजऱ्याचा सुवासिक घनसाळ परदेशात जाणार

आजऱ्याचा सुवासिक घनसाळ परदेशात जाणार

googlenewsNext

* घनसाळचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्याचे नियोजन

सदाशिव मोरे। आजरा

ग्राहकांच्या मनावर आपल्या सुवासिक व चवदारपणाने अधिराज्य गाजविलेला ‘आजरा घनसाळ’ आता परदेशात जाणार आहे. परदेशातील ग्राहकांच्या मागणीप्रमाणे घनसाळ भातावर प्रक्रिया करण्यासाठी १ कोटी ७७ लाखांचा राईस मिलचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. तर आजरा तालुका शेतकरी विकास मंडळ व कृषी विभागाच्यावतीने घनसाळ भाताचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्याचे नियोजन सुरू आहे. आजरा तालुक्यात घनसाळ भातासाठी योग्य हवामान, मुबलक पाऊस व जमिनीतील लोह व जांभ्या खडकाचे प्रमाण यामुळे सुवासिक व चवदारपणा वाढतो. गेल्या दहा वर्षांपासून पुणे, मुंबईसह देशातील मोठ्या बाजारपेठेतील ग्राहकांच्या पसंतीस पडलेला आजरा घनसाळ तांदूळ आहे. चार वर्षांपूर्वी भौगोलिक मानांकन हा दर्जाही प्राप्त झाला आहे. सध्या तालुक्यात रासायनिकबरोबर सेंद्रिय खतांचा वापर करून घनसाळ भाताचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. घनसाळ भाताचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून आजरा तालुका शेतकरी विकास मंडळ व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना प्रबोधन, बांधावर जाऊन मार्गदर्शन, रोप लागण ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांना माहिती दिली जाते.

-----------------------

* घनसाळचे ५०० एकरावर उत्पादनाचे उद्दिष्ट

घनसाळ तांदळाबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये जागरूकता झाली आहे. पूर्वी २० ते २५ एकरावर होणारा घनसाळ आता २४० ते २५० एकरावर उत्पादित केला जातो. घनसाळ तांदूळ परदेशात पाठविण्यासाठी उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी चालूवर्षी ५०० एकरावर लागवडीचे नियोजन केले आहे. -----------------------

* ११८ शेतकऱ्यांना जी. आय. प्रमाणपत्र

तालुक्यातील ११८ शेतकरी सध्या घनसाळ भाताचे उत्पादन घेतात. चेन्नई येथील भौगोलिक उपदर्शन (जी. आय.) रजिस्ट्रेशन कार्यालयाने घनसाळ भाताचे उत्पादन करण्यासाठी प्रमाणपत्र दिले आहे. चालू वर्षात घनसाळचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. -----------------------

* ‘घनसाळ’चे ४८ गावांत उत्पादन

आजरा तालुक्यातील ३५ ते ४८ गावांतील वातावरण घनसाळच्या उत्पादनास योग्य व अनुकूल आहे. त्यामुळे १ हजार हेक्टर क्षेत्रावर घनसाळचे पीक होऊ शकते. परदेशात तांदूळ पाठविणे व चांगला दर मिळणार असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन घेण्याकडे कल वाढला आहे. -----------------------

* ऊसापेक्षा घनसाळ बरा

घनसाळ भाताचे एकरी उत्पादन घेण्या साठी २२६०० इतका खर्च येतो तर खर्च वजा जाता ४२४०० उत्पन्न मिळते. ऊसाला एकरी ६७७०० रुपये खर्च येतो व खर्च वजा जाता १९,३०० रुपये उत्पन्न मिळते. घनसाळसाठी ६ महिने, तर उसासाठी १२ महिने कष्ट करावे लागतात. हा अभ्यास तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला असून, ऊसापेक्षा घनसाळ बरा, असे तज्ज्ञांचे मत आहे. -----------------------

फोटो ओळी : घनसाळ भाताचे आलेले जोमदार पीक व घनसाळ भाताच्या लोंब्या. क्रमांक : ३११२२०२०-गड-०२/०३

Web Title: The fragrant scent of the sick will go abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.