फ्रान्सच्या फिलीपचा कागल येथे मुक्काम-कागलच्या शाहू स्टेडियममधील जलतरण तलावाजवळ रमला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 01:22 AM2018-05-18T01:22:30+5:302018-05-18T01:22:30+5:30
पंचेचाळीस हजार किलोमीटरचा प्रवास करीत ८० देश फिरत फ्रान्सचा फिलीप नावाचा ४९ वर्षीय प्रवासी दोन दिवस कागलच्या शाहू स्टेडियममधील जलतरण तलावाजवळ रमला आहे.
जहॉँगीर शेख ।
कागल : पंचेचाळीस हजार किलोमीटरचा प्रवास करीत ८० देश फिरत फ्रान्सचा फिलीप नावाचा ४९ वर्षीय प्रवासी दोन दिवस कागलच्या शाहू स्टेडियममधील जलतरण तलावाजवळ रमला आहे. सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज अश छोटेघर वजा वाहनात त्याचा मुक्काम आहे. कोठे जायचे? कोठे राहायचे? किती दिवस फिरायचे? असे कोणतेच नियोजन नाही.
बस्स मन रमेल तेथे थांबायचे आणि इच्छा संपली की पुढचा मार्ग पकडायचा असा हा प्रवासी आहे.
फ्रान्समधील नॉर्थ-वेस्ट भागात गिअरस येथे राहणारा फिलीप हा एका बोटीवर कॅप्टन म्हणून काम करीत होता. पत्नीसह तो भ्रमंतीसाठी बाहेर पडणार होता; कौटुंबिक अडचणीमुळे पत्नी सहभागी झाली नाही. पण जगप्रवासासाठी खास वाहन तयार करून घेतलेले. सर्व तयारी झाली असल्याने फिलीप एप्रिल २०१७ ला एकटाच बाहेर पडला.
फ्रान्स, युक्रेन, रशिया, कझाकिस्तान, मंगोलिया, कंबोडीया, कोरीया, जपान, चीन असे विविध ७९ देश फिरत तो भारतात पश्चिम बंगालमध्ये आला आहे. गेले तीन महिने तो भारत फिरत आहे. ओरिसा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, कर्नाटकानंतर तो दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आला. दुपारी उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर तो आंघोळीसाठी स्विमिंग पूल शोधत होता. कागलमधील जलतरण तलावाजवळ दोन दिवस झाले तो येथेच मुक्कामी आहे.
वाहन नव्हे, छोटे घरच...
प्रवासासाठी त्यांनी टेम्पो ट्रॅव्हलरसारखी एक गाडी खास बनवून घेतली आहे. हे एक छोटे घरच आहे. झोपण्यासाठी बेड, डायनिंग टेबल, साहित्य ठेवण्याचे कपाट, फ्रिज, पंखा, ए. सी., जेवण बनविण्यासाठीची छोटी यांत्रिक उपकरणे, छोटे टॉयलेट वगैरे सोयी यामध्ये आहेत. शिल्लक पेट्रोल साठाही ठेवण्यासाठी व्यवस्था आहे. दरवाजा एकच आहे, तर वाहन चालविण्याच्या ठिकाणी खिडकी काच आहे. बाकी खिडक्या वगैरे नाहीत.
कागलची हवा चांगली आहे : ‘लोकमत’शी बोलताना फिलीप म्हणाला की, भारतात मी साडेतीन महिने आहे. इतका काळ कोठे रमलो नाही. विदेशात भारतीयांच्याबाबतीत खूपच गैरसमज आहेत. येथे वस्तुस्थिती वेगळी आहे. कागलची हवा तर खूप चांगली आहे. म्हणून दोन दिवस येथेच मुक्काम केला आहे.
कागलकरांकडून पाहुणचारही...
फिलीप याला येथील जलतरण तलावातील कर्मचाऱ्यांनी सर्व सहकार्य केले आहे. श्रीकांत अथणे यांनी त्याला महाराष्ट्रीयन जेवण दिले आहे, तर शाहू क्रीडांगणावर सुरू असलेल्या कागल क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरणही फिलीप याच्या हस्ते करण्यात आले.