फ्रान्सच्या जेतेपदाचा कोल्हापुरात जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:44 AM2018-07-16T00:44:38+5:302018-07-16T00:44:43+5:30
कोल्हापूर : ‘फिफा’ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सच्या फुटबॉल संघाने अनुभवाच्या जोरावर क्रोएशियाच्या संघाचा ४-२ अशा गोलफरकाने धुव्वा उडविला. फ्रान्सच्या या विजयाचा आनंद कोल्हापूरच्या फुटबॉलप्रेमींनी आपल्या हटके स्टाईलने साजरा केला. क्रोएशियाचा पराभव देखील अनेकांच्या जिव्हारी लागला.
कोल्हापूरमधील फुटबॉलप्रेमी अर्जेंटिना, पोर्तुगाल आणि ब्राझील यांचे निस्सीम चाहते आणि कट्टर समर्थक आपापल्या आवडत्या संघांना प्रोत्साहन देत होते. हे संघ बाहेर पडल्यानंतर कोल्हापूरच्या काही चाहत्यांनी फ्रान्सला, तर काहींनी क्रोएशियाला समर्थन दिले. क्रोएशिया-फ्रान्स यांच्यातील अंतिम सामन्याची फुटबॉलप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता होती. शहरातील जुना बुधवार तालीम, कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन, जय पद्मावती तरुण मंडळ, खंडोबा तालीम, पाटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, गंगावेश, संध्यामठ, बीजीएम, खराडे कॉलेजसह हॉटेल आणि मॉल, आदी ठिकाणी मोठे स्क्रीन लावण्यात आले होते. फ्रान्सने अनुभवाच्या जोरावर पुन्हा एकदा विश्वचषकावर नाव कोरले. फ्रान्स समर्थकांनी चौकामध्ये घोषणाबाजी करीत जल्लोष साजरा केला; तर क्रोएशिया समर्थकांच्या आनंदावर विरजण पडले. सोशल मीडियावर फ्रान्सच्या विजयाचे, तर क्रोेएशियाच्या पराभवाच्या मेमचा पाऊस पडला.