शिरढोणच्या १३ तत्कालीन सदस्यांवर गैरव्यवहाराचा ठपका

By admin | Published: October 2, 2015 01:11 AM2015-10-02T01:11:14+5:302015-10-02T01:13:26+5:30

रस्ता गैरव्यवहार प्रकरण : प्रत्येकी २९ हजार वसूल करण्याचे आदेश

The fraud of 13 members of Shirdhon's scandal | शिरढोणच्या १३ तत्कालीन सदस्यांवर गैरव्यवहाराचा ठपका

शिरढोणच्या १३ तत्कालीन सदस्यांवर गैरव्यवहाराचा ठपका

Next

कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथील बाह्यवळण रस्त्याच्या कामात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी माजी सरपंचासह तत्कालीन तेरा सदस्यांना प्रत्येकी २९ हजार १८४ रुपयांप्रमाणे ३ लाख ७९ हजार ३७८ रुपये एक महिन्याच्या आत भरण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांनी दिले आहेत. गैरव्यवहारप्रकरणी संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांनाच दोषी ठरविण्याचा तालुक्यातील हा पहिलाच प्रकार आहे. या निर्णयाने ग्रामपंचायत सदस्यांना धक्का बसला असून, राजकीय खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते मधुकर सासणे व रमेश ढाले यांनी तक्रार केली होती.
इचलकरंजी नगरपालिकेकडून करण्यात आलेल्या पाईपलाईनच्या कामातील रस्त्याच्या खुदाईच्या नुकसानपोटी २० लाख ५६ हजार इतकी रक्कम शिरढोण ग्रामपंचायतीस नोव्हेंबर २०१२ मध्ये देण्यात आली होती. या रकमेतून २०१४ मध्ये रस्त्याचे काम सुरू करण्यात आले; मात्र काम पूर्ण करण्यापूर्वीच व कामाचे मूल्यांकन होण्यापूर्वीच ३ लाख ७९ हजार ३८४ इतकी रक्कम ठेकेदारास देण्यात आली होती. त्यामुळे या कामात गैरव्यवहार झाला असून, त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी सासणे व ढाले यांनी जिल्हा परिषदेकडे केली होती. तसेच त्याचा पाठपुरावा म्हणून त्यांनी २६ ते २८ जानेवारी २०१५ अखेर ग्रामपंचायतीसमोर उपोषणही केले होते.
तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून ३ लाख ७९ हजार ३८४ इतक्या अपहार रकमेची जबाबदारी तत्कालीन सरपंचासह तेरा सदस्यांवर निश्चित केली आणि त्याचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा चौकशी अहवाल ग्राह्य धरून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १७९ (१) नुसार जबाबदारी निश्चित झालेल्या प्रत्येक सदस्याने २९ हजार १८४ रुपये एक महिन्याच्या आत भरण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी पवार यांनी दिले आहेत. गैरव्यवहार प्रकरणी संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांनाच दोषी ठरविण्याचा तालुक्यातील हा पहिलाच प्रकार असून, या निर्णयाने दोषी सदस्यांना धक्का बसला असून, राजकीय खळबळ उडाली आहे.
रकमेची वसुली लागलेल्या तेरा सदस्यांमध्ये तत्कालीन सरपंच बबर पांडुरंग कांबळे, रशिदा इलाई सय्यद, सचिन भास्कर कोईक, संगीता बाळकृष्ण माळकरी, राजश्री मनोहर टाकवडे, बसवेश्वर बंडू मोरडे, राजश्री शांतीनाथ शंभूशेट्टी, श्रीपाल धुळाप्पा कापसे, दिलीपकुमार लखगोंडा पाटील, अविनाश रामगोंडा पाटील, महादेव आण्णाप्पा पुजारी, सातगोंडा दत्ता पुजारी, रमेश श्रीपती ढाले या सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान, तक्रारदार असलेल्या ढाले यांनाही दोषी ठरवून रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)


सार्वजनिक कामातील गैरव्यवहार आम्ही कधीही खपवून घेणार नाही. या अपहाराबाबत ग्रामस्थांच्या मनात तीव्र संताप होता. त्यांना न्याय मिळाल्याने हा विजय ग्रामस्थांचाच आहे. येथून पुढे काम करताना पारदर्शी करावे, तसेच नव्याने निवडून आलेल्या सदस्यांनी याचा बोध घ्यावा.
- मधुकर सासणे, शिरढोण
सामाजिक कार्यकर्ते व तक्रारदार

Web Title: The fraud of 13 members of Shirdhon's scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.