नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक, डॉक्टर पिता-पुत्रावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 08:23 PM2019-02-20T20:23:16+5:302019-02-20T20:24:29+5:30
कोल्हापूर : येथील श्री स्वामी विवेकानंद संस्थेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून साडेतीन लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी डॉक्टर पिता-पुत्रावर राजारामपुरी ...
कोल्हापूर : येथील श्री स्वामी विवेकानंद संस्थेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून साडेतीन लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी डॉक्टर पिता-पुत्रावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. संशयित डॉ. अभिजित दगडू पोवार (वय ३५), त्याचे वडील दगडू बाळू पोवार (५५, दोघे रा. कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी, फिर्यादी हर्षद अनंत गुरव (३५, रा. राजारामपुरी १४ वी गल्ली) यांची डॉ. अभिजित पोवार याच्याशी ओळख झाली. गुरव यांना नोकरीची गरज होती. डॉ. पोवार याने आमच्या वडिलांची श्री स्वामी विवेकानंद संस्थेत चांगली ओळख आहे. त्यांनी यापूर्वी अनेकांना नोकरी लावली आहे. तुलाही नोकरी लावतो, असे म्हणून त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपये घेतले.
त्यानंतर शिक्षण संस्थेत तात्पुरत्या नोकरीचे आमिष दाखवून खोट्या सह्या आणि शिक्क्यांची बोगस आॅर्डर त्यांना दिली. त्यांनी संस्थेत चौकशी केली असता, अशी कोणतीही आॅर्डर काढली नसल्याचे सांगण्यात आले. तसेच पोवार कुटुंबीयांचा संस्थेशी काडीमात्र संबंध नसल्याचे स्पष्ट केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, गुरव यांनी डॉ. अभिजित पोवार याच्याकडे पैशाची मागणी केली. त्याने दोन लाख रुपयांचा धनादेश दिला. तो बँकेत भरला असता, वटला नाही. वारंवार पैसे मागूनही टाळाटाळ होत असल्याच्या कारणातून गुरव यांनी बापलेकांच्या विरोधात जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला.