दामदुप्पटच्या नावाखाली फसवणूक: स्टोअर्संना लागले कुलूप, परतावेही झाले बंदच; गुंतवणूकदारांच्या जीवाला घोर

By विश्वास पाटील | Published: November 29, 2022 11:39 AM2022-11-29T11:39:38+5:302022-11-29T11:41:50+5:30

ज्यांनी सुरुवातीला गुंतवणूक केली त्यांचे उखळ पांढरे झाले. नंतर गुंतवणूक केली ते मात्र चांगलेच अडकले

Fraud in the name of double money: refunds also stopped, Investors lives are threatened | दामदुप्पटच्या नावाखाली फसवणूक: स्टोअर्संना लागले कुलूप, परतावेही झाले बंदच; गुंतवणूकदारांच्या जीवाला घोर

संग्रहित फोटो

googlenewsNext

विश्वास पाटील

कोल्हापूर : जीवनावश्यक दैनंदिन किराणा माल तसेच किरकोळपासून मोठ्यात मोठ्या आजारांसाठी लागणारी औषधे स्वस्तात देण्याचा आणि केलेल्या गुंतवणूकीचा आकर्षक परतावा देण्याचा भुलभुलैय्या करणाऱ्या एका स्टोअर कंपनीचा हत्ती आता चिखलात रुतला आहे. यामुळे हजारांपासून लाखोपर्यंत गुंतवणूक केलेल्यांचे धाबे दणाणले असून परतावा राहू देत, किमान केलेली गुंतवणूक तरी मिळेल की नाही याच्या चिंतेने त्यांच्या जीवाला घोर लागला आहे. मुख्यत: राधानगरी- भुदरगड तालुक्यात या स्टोअर्समध्ये प्रचंड गुंतवणूक झाली आहे.

कमी गुंतवणीत जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून सुरवातीला बक्कळ पैसा मिळवायचा आणि मग अचानक गाशा गुंडाळून परागंदा व्हायचे हाच फॉर्मुला वापरून साधारणतः चार-पाच वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या स्टोअर या कंपनीचाही प्रवास आता याच मार्गाने सुरु झाला आहे. कंपनीचे मालक या महिन्याअखेर कंपनी नव्या जोमाने सुरु होणार असल्याचा व मिळालेला परतावा वजा करून राहिलेली रक्कम देणार असल्याचा विश्र्वास देत आहेत परंतू प्रत्यक्षात तसे कांही घडताना दिसत नाही. अन्य कंपन्यानुसारच ज्यांनी सुरुवातीला गुंतवणूक केली त्यांचे उखळ पांढरे झाले. नंतर गुंतवणूक केली ते मात्र चांगलेच अडकले आहेत.

परतावा तरी मिळत होताच शिवाय दुकाने सुरु झाल्याने तिथे स्वस्तात माल मिळत असल्याने लोकांचा जास्त विश्र्वास बसला. कारण फायदा थेटच अनुभवताच येत होता. सामान्यांपासून ते गर्भश्रीमंतापर्यंत किराणा माल कमी दरात मिळावा ही सर्वांचीच हाव असते. वाढत्या आजारांच्या फैलावामुळे औषधोपचारांसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाची चिंता सर्वांनाच सतावते. अन्न आणि औषधे स्वस्तात देण्याचा फंडा ओळखून या कंपनीने गोवामार्गे राज्यात पाऊल टाकले. कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेचा तोंडातोंडी प्रसार झाल्याने गुंतवणूक करणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढली.

नवीन गुंतवणूकदार जमा करणाऱ्यांना आकर्षक कमिशन होते त्यामुळे गावागावात एजंट तयार झाले. साखळी पद्धतीने वाढणारी ही योजना वर्षभरात घराघरांत पोहचली. शेतकऱ्यांपासून ते पुढाऱ्यांपर्यंत आणि शिपायांपासून ते डॉक्टर, वकिलांपर्यंत नऊ हजार ते पाच लाख रुपयांची सरासरी गुंतवणूक केल्याचे दिसते.

असा होता गुंतवणूकीचा फॉर्मुला...

कंपनीने केलेल्या योजनेनुसार ९ हजारांपासून ते पाच लाखांपर्यंत यात गुंतवणूक करण्याची मुभा होती. नऊ हजारांच्या गुंतवणूकीसाठी प्रतिमहिना ८२५ रुपये परतावा ३६  महिने दिला जात होता..याच पटीत केलेल्या गुंतवणूकीसाठी परतावा मिळत होता. किराणा माल खरेदी करताना नऊ हजाराच्या गुंतवणूकीवर वार्षिक २२०० रुपयांचे भेट कूपन मिळणार होते. तेवढ्या रक्कमेवर ३३ टक्के सूट दिली जात असे. किराणाशिवाय औषधे खरेदी करणाऱ्यांसाठीही अशीच सवलत होती.

डोक्यावर पावशेर तेल..

दिवाळीत या स्टोअर्समधून २८०० रुपयांचा खाद्य तेलाचा कॅन २२०० रुपयांना मिळत होता. त्यामुळे लोकांची हे कॅन न्यायला झुंबड उडत असे. त्यावेळी स्वस्तात मिळतात म्हणून तेलाचे कॅन पळवणारे आता परतावे मिळत नाहीत म्हणून झोपताना डोक्यावर पावशेर तेल घालून शांतता मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

या पट्ट्ट्यात गावेच्या गावे

या स्टोअर्समध्ये मुख्यत: आकनूर, सरवडे,नरतवडे, कासारवाडा, गारगोटीमध्ये जास्त गुंतवणूक झाली. त्यातही गुंतवणूक करणारा मुख्यत: प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे प्रमाण जास्त होते.

व्यवहार झाले ठप्प..

मुदाळतिठ्ठा, बिद्री, कूर, गारगोटी आणि कोल्हापूरातही तीन-चार ठिकाणी स्टोअर्स सुरु झाले होते. सरवडे येथे बिल्डींग घेतली. माल ठेवण्यासाठी रॅकही घेतले परंतू स्टोअर्स सुरु झाले नाही. या स्टोअर्सना प्रत्यक्षात कुलुपे लागलेली नसली तरी जूनपासून तेथील विक्री पुरती थंडावली आहे. गुळाचे रवे व तत्सम स्वरुपाचे न खपलेले साहित्य आता या स्टोअर्समध्ये पडून आहे.

Web Title: Fraud in the name of double money: refunds also stopped, Investors lives are threatened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.