क्रेडिट कार्ड वापरण्यापूर्वीच ५० हजार गेले; वार्षिक शुल्क भरण्याचे निमित्त

By विश्वास पाटील | Published: January 13, 2024 08:55 AM2024-01-13T08:55:42+5:302024-01-13T08:55:55+5:30

दोन टप्प्यांत काही क्षणात घातला गंडा

fraud of 50 thousand before using the credit card | क्रेडिट कार्ड वापरण्यापूर्वीच ५० हजार गेले; वार्षिक शुल्क भरण्याचे निमित्त

क्रेडिट कार्ड वापरण्यापूर्वीच ५० हजार गेले; वार्षिक शुल्क भरण्याचे निमित्त

विश्वास पाटील, कोल्हापूर : आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड आले. परंतु ते त्या पाकिटातून काढलेही नाही तोपर्यंत त्यावरील ५० हजारांच्या बॅलन्सवर डल्ला मारल्याचा अनुभव कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील उच्च शिक्षित तरुणीस आला. ७ नोव्हेंबरला ही घटना घडली, पोलिसांत वारंवार तक्रार करूनही दाद मिळत नसल्याची तक्रार तिने केली.

जुना राजवाडा पोलिसांत अनेकदा हेलपाटे मारले परंतु फायदा काहीच झाला नाही, आता पोलिस त्यांना तुमची तक्रार सायबर सेलकडे पाठवली असल्याने जुना राजवाडा पोलिसांतील तक्रार मागे घेण्याचा सल्ला देत आहेत.

घडले ते असे : संबंधित तरुणीस बँकेतून कार्डसाठी फोन आला. आय मोबाईल ॲप्लिकेशन दिले. त्यावर माहिती भरल्यावर आठवड्यात कार्ड घरी आले. त्यानंतर पंधरा दिवसांनी फोन आला. बँकेतून बोलतोय, तुमचे कार्ड ५० हजारचे असून ते ॲक्टिवेट करायला हवे. त्याचे वार्षिक शुल्क कपात होण्यासाठी सेटिंगमध्ये थोडी माहिती भरण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यासाठी पुन्हा तेच आय मोबाईल ॲप्लिकेशन  पाठवले. त्याने पिन किंवा ओटीपी न मागता फक्त सीव्हीव्ही नंबर भरायला सांगितला. व्हॉटस ॲपवर सीव्हीव्ही नंबर शेअर करताच २० हजार क्रेडिट झाल्याचा मेसेज आला. तातडीने बँकेकडून मेसेज आला की ही खरेदी तुम्ही केली नसेल तर ९ बटन दाबा, त्यानुसार करूनही पुढच्या काही क्षणात पुन्हा २८,७३६ रुपये गेले. लगेच बँकेत जाऊन कार्ड ब्लॉक केले. सायबर सेलकडे तक्रार केली परंतु बँकेने रेफरन्स आणि ट्रान्झेक्शन नंबर द्यायला आठ दिवस लावले त्यामुळे व्यवहार सील करता आले नाहीत.
दरम्यान, अशा घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाढ झाली असून  नागरिकांनी सजगपणे बँकिंग व्यवहार करण्याची गरज आहे. तसेच सायबर पोलिसांनी अशा घटनांचा तपास वेगाने करण्याची गरज आहे.

बापरे...परतफेडीस १८ टक्के व्याज आणि जीएसटी... 

या फसवणुकीचा सायबरकडून दोन महिन्यांत शोध लागला नाही तर पैसे भरावे लागतात. त्यासाठी हप्ते मागितले तर त्यावर १८ टक्के व्याज आणि जीएसटी भरावी लागेल. ही रक्कम ९ हजार रुपये असेल असे सांगण्यात आले. हा सगळा व्यवहार पाहिल्यानंतर बँक आणि हॅकर्स यांचे काही संगनमत आहे की काय, अशी शंका तक्रारदारांना आली.

Read in English

Web Title: fraud of 50 thousand before using the credit card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.