Kolhapur: दरमहा ८ टक्क्याचे आमिष; ४ कोटींचा गंडा, कळे-कोलोली परिसरातील सूत्रधार
By विश्वास पाटील | Published: March 19, 2024 01:39 PM2024-03-19T13:39:44+5:302024-03-19T13:40:02+5:30
फसवणूक झालेल्यांच्या पोलिसांत चकरा
विश्वास पाटील
कोल्हापूर : ज्यांना फॉरेक्समधील फ माहीत नाही अशा लोकांनी मी तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये महिन्याला आठ टक्के नफा कमवून देतो, असे आमिष दाखवून सुमारे चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यातील कांही गुंतवणूकदारांनी पोलिस अधीक्षक व शाहूपुरी पोलिसांकडे लेखी तक्रार करूनही पोलिस दाद घ्यायला तयार नाहीत. फसवणूक प्रकरणातील म्होरके कळे-कोलोली (ता.पन्हाळा) परिसरातील आहेत. ते रोज नवा वायदा देत असून दहशतही दाखवत असल्याच्या गुंतवणूकदारांच्या तक्रारी आहेत. जिल्हा परिषदेच्या राजकारणाशी संबंधित असलेले हे लोक आपण अमूक-तमूक नेत्याच्या जवळ असल्याचे मोठेपण पंचक्रोशीत मिरवत असतात.
एका प्राध्यापकाची ३० लाख रुपयांची फसवणूक झाली असून त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे त्यासंबंधीची तक्रार केली आहे. कळे परिसरातील एका पुढाऱ्याचा गावात सरपंच असलेला मुलगा, कोल्हापुरात राहत असलेला दुसरा मुलगा आणि त्यांचाच जवळचा पाहुणा असलेला कोलोलीचा एक जण यांनी मिळून हा गंडा घातला आहे. त्यांनी २०२२ कोल्हापुरात पर्ल नावाने शेअर मार्केटिंग करणारी कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून अगोदर शेअर मार्केटिंग व नंतर फॉरेक्स ट्रेडिंगचा व्यवसाय सुरू केला.
परकीय चलन (फॉरेक्स) ट्रेडिंग ही व्यापारातून नफा मिळवण्याच्या उद्देशाने एक चलन खरेदी करण्याची आणि दुसरे चलन विकण्याची प्रक्रिया आहे. हा दोन देशांतील चलनाशी संबंधित व्यवहार आहे. पर्ल कंपनीचे म्हाेरके स्वत:च्याच कॉलेजला कधीही न जाता कसेबसे पदवीधर झालेले आहेत. त्यातील कोलोलीचा तरुण अभियांत्रिकी शाखेशी संबंधित आहे. त्यांना शेअर मार्केट किंवा फॉरेक्स ट्रेडिंग यासंबंधीचे काडीचे ज्ञान नसतानाही शेअर मार्केटमधील जुजबी ज्ञान असलेल्या तरुणास पगारावर ठेवून त्यांनी ही फर्म सुरू केली व त्या माध्यमातून पैसे गोळा केल्याचे पुढे आले आहे. सुरुवातीला परतावे मिळत होते, त्यामुळे कळे गावातीलच काहींनी शिल्लक रक्कम, कुणी जेसीबी विकून त्यामध्ये गुंतवणूक केली आहे. आणि परतावा सोडाच मूळ मुद्दलही मिळेना म्हणून गुंतवणूकदार आता हेलपाटे मारून टाचा झिजवू लागले आहेत.
पैसे देताना टाळाटाळ..
गुंतवणूकदारांच्या पैसे मागण्यासाठी कळे (ता. पन्हाळा) येथे चकरा वाढल्या आहेत. वडिलांकडे पैसे मागितले की ते मुलांना शिव्या देतात आणि मुलांकडे पैसे मागितले की ते वडिलांनी हा सगळा कारभार केलाय आणि आम्ही निस्तरायला लागलोय अशी भलामण करत आहेत. शपथा घेऊन आम्ही अमूक तारखेला पैसे परत देतो असेही आश्वासन दिले जात आहे. त्यातील काहींकडून त्यांनी नोकऱ्या लावतो म्हणूनही पैसे उचलल्याच्या तक्रारी आहेत.
कोलोलीच्या तरुणाने या प्रकरणात कनातीसकट मैदान अंगावर आल्याने गावातील घर व शेती विकायला काढल्याची माहिती गावातून समजली. तिथेही लोक पैसे मागायला येत असल्याचे सांगण्यात आले.