स्थावर मालमत्ता खरेदी व्यवहारातून पावणेतीन कोटींची फसवणूक, कोल्हापुरातील मिळकतीचा वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 06:47 PM2022-06-28T18:47:51+5:302022-06-28T18:48:35+5:30
संशयितांनी फ्लॅट परस्पर विक्री केला. मुंबईच्या दोघांवर गुन्हा दाखल
कोल्हापूर : येथील फुलेवाडी रिंगरोडवरील स्थावर मिळकत खरेदी करून देतो म्हणून सुमारे पावणेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. त्यानुसार गणेश प्रकाश चव्हाण (रा. हाफिज बेगम चाळ, आर.बी.मार्ग, मुंबई) व जयश्री प्रशांत मुळेकर (रा. माहिम, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत इम्तियाज अब्दुल शेख (वय ४०, रा. भोपाळ, मूळ रा. कुलाबा, मुंबई) यांनी पोलिसांत तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार शेख हे आय.टी. कंपनीत नोकरीस आहेत. संशयित प्रकाश चव्हाण आणि जयश्री मुळेकर या दोघांनी फुलेवाडी रिंगरोडवरील गुरुप्रसाद टॉवर्सच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट युनिट नं.१०१ हा शेख यांना खरेदी दस्ताने खरेदी करून दिला. पण त्या फ्लॅटचा ताबा न देता त्यामध्ये परस्पर भाडेकरू ठेवून त्याचे भाडेही घेतले तसेच त्याच टॉवर्समधील युनिट नं.१०२ हा शेख यांच्या नावे करून दिला परंतु तोच फ्लॅट संशयितांनी शिवराज पाटील यांना परस्पर विक्री केल्याचे दिसून आले तसेच त्याच टॉवर्समधील बेसमेंट युनिटमधील १००० स्वे. फुटांचा एक गाळा व ग्राऊंड फ्लोअरचा १५०० स्वे. फुटांचा एक गाळा, पहिल्या मजल्यावरील १५ हजार स्के. फुटांचा एक गाळा अशा मिळकती शेख यांना खरेदी दस्त करून देतो, असे सांगितले.
त्याबाबत त्यांनी विक्री करार (ॲग्रीमेंट टू सेल) केला, पण फिर्यादी शेख यांना कोणतीही माहिती अगर पैसे परत न देता परस्पर सुरेखा राणे नामक महिलेला खरेदी देऊन फिर्यादी शेख यांची फसवणूक केली. हा सर्व प्रकार जानेवारी २०१९ ते दि. २७ जून २०२२ या कालावधीत घडल्याची तक्रार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात शेख यांनी दिली. त्यानुसार गणेश चव्हाण व जयश्री मुळेकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.