कोल्हापूर महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष, खोटे नियुक्तीपत्र देऊन पावणेदोन लाखांची फसवणूक; एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 01:10 PM2023-03-11T13:10:47+5:302023-03-11T13:11:55+5:30

पाकीट हरवल्याचे सांगून शंभर रुपये घेतले. पैसे परत देण्याच्या कारणाने संपर्क वाढवला अन् घातला गंडा 

Fraud of two lakhs by giving false appointment letter by pretending to get a job in Kolhapur Municipal Corporation; Arrested one | कोल्हापूर महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष, खोटे नियुक्तीपत्र देऊन पावणेदोन लाखांची फसवणूक; एकास अटक

कोल्हापूर महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष, खोटे नियुक्तीपत्र देऊन पावणेदोन लाखांची फसवणूक; एकास अटक

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावतो असे सांगून, खोटे नियुक्तीपत्र देऊन पावणेदोन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांत गुरुवारी रात्री एका भामट्यावर गुन्हा दाखल झाला. संतोष रंगराव पाटील (रा. पांगिरे, ता. भुदरगड) असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथील युगंधर बाळासाहेब मगदूम (वय २६) आणि आरोपी पाटील याची ओळख मार्च २०२१ मध्ये गडहिंग्लज बसस्थानकावर झाली. पाटील हा माझे पाकीट हरवले आहे, त्यामुळे बससाठी पैसे हवेत, अशी मागणी बसस्थानकात काही प्रवाशांकडे करीत होता. त्यावेळी युगंधर याच्या आईने त्याला माणुसकीच्या भावनेने शंभर रुपये दिले. हे पैसे परत करण्यासाठी संपर्क साधतो, असे सांगून पाटील याने युगंधरचा मोबाईल नंबर घेतला. यातून दोघांचा संपर्क सुरू झाला. ओळख वाढली.

ओळखीतून पाटील याने महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावतो म्हणून मार्च ते जुलै २०२१ अखेर वेळोवेळी आणि रोखीने १ लाख ७५ हजार १०० रुपये युगंधरकडून घेतले. महापालिकेचा शिक्का, सही मारून खोटे नियुक्तीपत्र दिले. पाटील याने बनावट सही व शिक्का मारून नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केली. फसवणूक झालेले मगदूम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष पाटील याच्यावर गुन्हा दाखल झाला.

नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक झाल्याच्या घटना रोज उघडकीस येत आहेत. त्याच्या बातम्या वृत्तपत्रांतून ठळकपणे येत असतानाही लोक कशाचीही चौकशी न करता कुण्याही भामट्यास पैसे देत आहेत आणि फसवणुकीला बळी पडत असल्याचे चित्र आहे.

मॅडम आणि साहेबांना पैसे द्यावे लागतात

आरोपी पाटील याने सुरुवातीस युगंधरला महापालिका स्वच्छता विभागात मुकादम म्हणून नेमतो असे सांगितले. त्यानंतर लिपिक पदासाठी मॅडम आणि साहेबांना जास्त पैसे द्यावे लागतील, असे सांगून पावणेदोन लाख रुपये उकळले. प्रत्यक्षात मुकादम आणि लिपिक पदावर युगंंधरला नोकरी मिळाली नाही. प्रत्येक वेळी विविध कारणे सांगून पाटील टोलवत राहिला. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर युगंधरने पोलिस ठाणे गाठले.

Web Title: Fraud of two lakhs by giving false appointment letter by pretending to get a job in Kolhapur Municipal Corporation; Arrested one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.