फसवणुकीस अधिकारीच जबाबदार : आयडीबीआयच्या अधिकाऱ्यांची सोमवारी चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:42 AM2018-10-13T00:42:01+5:302018-10-13T00:44:07+5:30
पीक व पाईपलाईन कर्ज योजनेच्या नावाखाली बनावट सातबारा उतारे देऊन झालेल्या फसवणुकीस स्वत: ‘आयडीबीआय’ बँकेचा व्यवहारच कारणीभूत असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. कारण या सर्व व्यवहारांत बँकेने आधी कर्जवाटप केले व त्यानंतर संबंधित शेतकºयांच्या खात्यावर बोजा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली;
- विश्वास पाटील ।
कोल्हापूर : पीक व पाईपलाईन कर्ज योजनेच्या नावाखाली बनावट सातबारा उतारे देऊन झालेल्या फसवणुकीस स्वत: ‘आयडीबीआय’ बँकेचा व्यवहारच कारणीभूत असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. कारण या सर्व व्यवहारांत बँकेने आधी कर्जवाटप केले व त्यानंतर संबंधित शेतकºयांच्या खात्यावर बोजा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली; परंतु कर्जाची नोंद संबंधित शेतकºयांच्या सातबारा उताºयावर झालेलीच नाही. त्यामुळे ही रक्कम वसूल होण्याची शक्यताही धूसर आहे.
या प्रकरणी बँकेच्या वरणगे (ता. करवीर) शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक जयंत गंधे व बँक अधिकारी मनोजकुमार बोरसे यांना चौकशीसाठी सोमवारी (ता. २२) बोलाविले असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अरविंद कांबळे यांनी सांगितले.
या प्रकरणी म्हालसवडे येथील एकाच प्रकरणात राजाराम दादू पाटील व सुमित राजाराम पाटील यांना अटक करण्यात आली. त्यांना १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. २३ लाखांच्या फसवणूकप्रकरणी एकाच कुटुंबातील सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पीक कर्ज व्यवहारात शेतकºयाला तशी सहजासहजी फसवणूक करता येत नाही.
कारण त्याची प्रक्रिया क्लिष्ट असते. कर्जदार शेतकºयाने बँकेकडे कर्जमागणी केली व कर्ज मंजूर झाले तर बँक संबंधित शेतकºयाच्या सातबारा उताºयास इतर हक्कात नोंद करून आणावी, असे पत्र देते. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ज्यांचे पीक व इतर मध्यम मुदतीचे कर्ज एक लाखापेक्षा जास्त आहे, अशाच कर्जाची शेतकºयाच्या सातबारा उताºयावर नोंद होते. तसे हजार-दीड हजार रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र करून द्यावे लागते. तलाठ्याने दाखला दिल्यानंतरच बँक संबंधिताच्या खात्यावर पैसे वर्ग करते. परंतु या प्रकरणात बहुतांश प्रक्रिया धाब्यावर बसवूनच कर्जवाटप झाल्याचे चौकशीत पुढे आले आहे.
आरळेचा संतोष पाटील फरार
या प्रकरणातील सूत्रधार असलेल्या संतोष बळवंत पाटील (रा. आरळे) हा फरार आहे. राजाराम पाटील यांची एकत्रित कुटुंबाची १५ एकर जमीन आहे. त्यातील राजाराम पाटील याच्या नावावर प्रत्यक्षात साडेचार एकर जमीन असताना उतारे मात्र ३० एकर क्षेत्राचे दिले आहेत. हा उद्योग संतोष पाटील याने केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यापोटी त्याला दोन लाख रुपये कमिशन मिळाल्याचे चौकशीत पुढे आले आहे.
शाखेमुळे वरणगेची बदनामी
आयडीबीआय बँकेची शाखा वरणगे असली तरी वरणगेतील शेतकºयांनी फसवणूक केल्याचे आतापर्यंत तरी कुठेही चौकशीत पुढे आलेले नाही; परंतु या प्रकरणी गावाची नाहक बदनामी होत असल्याची ग्रामस्थांची भावना आहे.
तलाठ्याचे शिक्के तयार
कोणत्याही गावाच्या तलाठ्याचाच काय, तहसीलदारांचाही गोल शिक्का आता चार तासांत तयार करून मिळत असल्याचे महसूल विभागातीलच सूत्रांनी सांगितले. तलाठ्यांकडे जे उमेदवार म्हणून काम करतात, ते तलाठ्यांंची सही मारून दाखले वाटतात अशा तक्रारी आहेत. लोकमतने चौकशी केल्यावर ‘तुम्हाला कोणत्या गावच्या तलाठ्याचा शिक्का पाहिजे ते सांगा; तासात आणून देतो,’ असे एकाने छातीठोकपणे सांगितले !