भाच्याकडून मावशीची २५ तोळे दागिन्यांसह २५ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:29 AM2021-07-07T04:29:17+5:302021-07-07T04:29:17+5:30
कोल्हापूर : शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने वेळोवेळी मावशीकडून २५ लाख १७ हजार रुपयांची उचल केली. त्यासोबत २५ तोळे ...
कोल्हापूर : शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने वेळोवेळी मावशीकडून २५ लाख १७ हजार रुपयांची उचल केली. त्यासोबत २५ तोळे सोन्याचे दागिने परस्पर गहाणवट ठेवून मावशीची फसवणूक केली. या प्रकरणी करवीर पोलिसांत संशयित भाच्याविरोधात सोमवारी गुन्हा नोंद झाला. याबाबतची फिर्याद छाया राजाराम चव्हाण (रा. राहुल हाॅटेलमागे, फुलेवाडी) यांनी दिली. नीलेश राजकुमार पाटील (रा. बुधवार पेठ, ढिसाळ गल्ली कोल्हापूर) असे गुन्हा नोंद झालेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, यातील संशयित हा फिर्यादी छाया यांच्या बहिणीचा मुलगा आहे. त्याने स्वत: काम करीत असलेल्या अनघालक्ष्मी स्टाॅक ब्रोकिंग प्रा. लि. नावाचे कंपनीत पैसे व सोने गुंतवा असे मावशीस सांगितले. त्यानुसार प्रत्यक्षात मावशीकडून वेळोवेळी २५ लाख १७ हजार रुपये घेतले. ही रक्कम कंपनीत न गुंतविता स्वत:च्या फायद्याकरीता वापरली. त्यासोबतच गरजेसाठी त्यांचे नावे गहाण ठेवलेले २५ तोळे सोने दागिने परस्पर विकून मावशीचा विश्वासघात करून फसवणूक केली. याबाबत फिर्यादीने करवीर पोलिसांत तक्रार अर्ज दिला. चौकशीत फसवणूक झाल्याचे पुढे आले. याबाबत सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता कार्यालय, यांचे मार्गदर्शन आणि करवीरचे पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन सुचनेनूसार फिर्यादी छाया यांनी संशयिताविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार करवीर पोलिसांनी संशयित नीलेशविरोधात गुन्हा नोंदविला.