जबाबदार मंत्र्यांची फसवी घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:16 AM2021-07-10T04:16:47+5:302021-07-10T04:16:47+5:30
: अनिल डाळ्या लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : जिल्ह्यामध्ये दुकाने चालू करण्यासाठी मिळालेल्या दुजाभावाच्या वागणुकीमुळे व्यापारी व नागरिक संतप्त ...
: अनिल डाळ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : जिल्ह्यामध्ये दुकाने चालू करण्यासाठी मिळालेल्या दुजाभावाच्या वागणुकीमुळे व्यापारी व नागरिक संतप्त असताना जबाबदार मंत्री फसव्या घोषणा करून जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. या अन्यायाविरोधात भाजप मैदानात उतरले आहे. व्यापारी व नागरिकांना त्यांचे हक्क दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शहर अध्यक्ष अनिल डाळ्या यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
पत्रकात, कोल्हापुरातील व्यापाऱ्यांच्या दबावामुळे कोल्हापूरच्या मंत्र्यांनी आपला मतदारसंघ अनलॉक केला. परंतु जिल्ह्यातील अन्य शहरांचा विचार केला नाही. परिणामी या दुजाभावाचा व्यापाऱ्यांना सामना करावा लागला. बंदमुळे अधिक अडचणीत असलेल्या व्यापाऱ्यांची आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी चेष्टा केली. शुक्रवारपासून अनलॉक होईल, अशी मुंबईत बसून घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र आदेश आला नाही. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा दुकान बंद करण्यास भाग पाडले. त्यामुळे सुरू करण्याची घोषणा ही एक राजकीय कुरघोडीचा एक भाग आहे, अशी टीका केली. इचलकरंजी शहराला कोणीही वाली राहिला नाही. परंतु येथील जनतेच्या हक्कासाठी भाजप पुढे सरसावले आहे. मंत्र्यांनी दुजाभाव थांबवावा; अन्यथा त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांचा सामना करावा लागेल, असा इशारा दिला.