फसवणुकीच्या गुन्ह्याची फाईलच झाली गायब

By admin | Published: March 25, 2015 12:14 AM2015-03-25T00:14:49+5:302015-03-25T00:42:45+5:30

गूळ उत्पादक फसवणूक प्रकरण : शाहूपुरी पोलिसांचा कारभार

Fraudulent file disappeared | फसवणुकीच्या गुन्ह्याची फाईलच झाली गायब

फसवणुकीच्या गुन्ह्याची फाईलच झाली गायब

Next

एकनाथ पाटील - कोल्हापूर  गूळ उत्पादक शेतकरी व बाजार समितीची २२ लाख रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात मार्केट यार्डमधील दोघा अडत दुकानदारांवर दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याची फाईलच गायब झाल्याचे तपास अधिकारी सांगत आहेत. न्यायालयाने गुन्हा दाखल करून ४ एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आठ दिवस उलटूनही तपास अधिकाऱ्यांच्या हाती फाईल न मिळाल्याने याप्रकरणाची साधी चौकशीही सुरू नाही. या प्रकारामुळे शाहूपुरी पोलिसांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
मार्केट यार्डमध्ये सचिन चंद्रकांत बरगे यांचे स्वामी समर्थ ट्रेडर्स व सुनील तुकाराम पाटील यांचे गणेश ट्रेडर्स ही दुकाने आहेत. या दोघांनी २०१३-१४ मध्ये बाजार समितीमार्फत जवळपास २० गूळ उत्पादक शेतकऱ्यांकडून सुमारे २२ लाख रुपये किमतीचा गूळ खरेदी केला होता. खरेदी केलेल्या गुळाचे पैसे त्यांनी बाजार समितीमध्ये भरले नाहीत; त्यामुळे प्रशासनाने त्यांना नोटीस पाठविली; परंतु त्यानंतरही त्यांनी पैसे भरण्यास टाळाटाळ केल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संपतराव हंबीरराव पाटील यांनी दोघांविरोधात कसबा बावडा येथील फौजदारी न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करत ४ एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश शाहूपुरी पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी १७ मार्चला अडत दुकानदार सचिन बरगे व सुनील पाटील यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी पोलीस उपनिरीक्षक अरुण कुलकर्णी यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली. कुलकर्णी यांनी याप्रकरणी दाखल केलेल्या कागदपत्रांच्या फाईलची माहिती घेतली असता त्यांना ती मिळू शकली नाही. ती कोणाकडे आहे याचीदेखील त्यांना कल्पना नाही. अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता तेही काही बोलत नाहीत. त्यामुळे फाईल नेमकी कोणाकडे आहे आणि ती पुढे का आणली जात नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
गूळ उत्पादकांसह बाजार समितीला सुमारे २२ लाखांचा गंडा घालणाऱ्या या दोघा अडत दुकानदारांना सुरुवातीस नोटीस पाठविल्याचे सांगण्यात आले; परंतु त्यांना तर साधी नोटीसही पाठविण्यात आलेली नाही. गुन्हा दाखल होऊनही पोलीस चौकशीला न आल्याने दुकानदारही बिनधास्त आहेत. गेले आठ दिवस गूळ उत्पादक न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत; परंतु न्यायालयाने आदेश दिल्यानंतर फक्त गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांनी केले आहे. त्यापुढचे चौकशीचे काम मात्र रेंगाळले आहे.


गूळ उत्पादक शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समितीची सुमारे २२ लाख रुपयांना फसवणूक प्रकरणाचा तपास माझ्याकडे देण्यात आला आहे; परंतु त्याची कागदपत्रे अद्याप मला मिळालेली नाहीत. सध्या मी सोलापूरला प्रशिक्षणासाठी आलो आहे. त्यानंतर वरिष्ठांकडे चौकशी करू. - अरुण कुलकर्णी,
तपास अधिकारी

Web Title: Fraudulent file disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.