घानवडेतील मुलींच्या वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:20 AM2021-05-30T04:20:09+5:302021-05-30T04:20:09+5:30
कोल्हापूर : घानवडे (ता. करवीर) येथील हौसाक्का शामराव पवार पाटील मागासवर्गीय मुलींच्या शासनमान्य वस्तीगृहात चालू शैक्षणिक वर्षासाठी पाचवी ते ...
कोल्हापूर : घानवडे (ता. करवीर) येथील हौसाक्का शामराव पवार पाटील मागासवर्गीय मुलींच्या शासनमान्य वस्तीगृहात चालू शैक्षणिक वर्षासाठी पाचवी ते बारावीच्या मुलींसाठी प्रवेश सुरू झाले आहेत. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी केले आहे. वसतिगृहातील मुलींना वर्षभर मोफत राहण्याची व शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली जाते.
सडोली खालसा (ता. करवीर) येथील दिवंगत दिनकरराव व शामराव पवार पाटील बंधू शैक्षणिक संस्थेमार्फत हे वस्तीगृह चालवले जाते. वसतिगृहातील प्रवेश मोफत असून अनुसूचित जाती जमाती, ओबीसीमधील शिक्षणापासून वंचित असलेल्या गोरगरिबांच्या मुलींना येथे प्रवेश दिला जातो. शासनाची मान्यता २४ जागांची असली तरी वाड्यावस्त्यावरील गोरगरीब मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून संस्था दरवर्षी वाढीव संख्येने आलेल्या मुलींचा खर्च स्वत: करते. गेल्यावर्षी ४० मुली येथे शिक्षण घेत होत्या. प्रवेश आता सुरू झाले असले तरी त्याला काही कालमर्यादा निश्चित केलेली नाही, जसे अर्ज येतील तसे प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे, असे वसतिगृह अधीक्षक विद्या लंबे यांनी सांगितले.
मुलींच्या शारीरिक व बौद्धीक विकासासाठी स्वतंत्र क्रीडांगणासह अभ्यासिका व सुसज्ज ग्रंथालयाचीदेखील सोय आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलींनी विद्या लंबे (९८५०८६५०२७) यांच्याशी संपर्क साधावा.