‘आयआरबी’ला फुकटच बंदोबस्त
By admin | Published: May 30, 2014 01:54 AM2014-05-30T01:54:54+5:302014-05-30T01:55:24+5:30
शासनाचे दुर्लक्ष : ५६ लाखांचे बिल केराच्या टोपलीत
एकनाथ पाटील / कोल्हापूर ‘आयआरबी’ कंपनीच्या शहरातील नऊ टोलनाक्यांना गेल्या काही महिन्यांत १५० दिवस २४ तास पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला. त्याचा खर्च ५६ लाखांपर्यंत जातो. हे पैसे कंपनीने द्यावेत, असा प्रस्ताव तत्कालीन पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी शासनाकडे पाठविला आहे. परंतु, शासनाने या प्रस्तावावर नजरही न फिरविता त्यास केराची टोपली दाखविली आहे. आता पुन्हा न्यायालयाच्या आदेशानुसार या टोलनाक्यांना फुकट पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येत आहे. शहरातील रस्ते विकास प्रकल्पासाठी २०११ पासून ‘आयआरबी’ कंपनी टोलवसुली करणार होती. परंतु, सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने याला विरोध करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, रास्ता रोको, घेरावो, निदर्शने, मानवी साखळी, यासारखी आंदोलने करून प्रसंगी नाके पेटविले. तसेच अद्याप रस्त्याची कामे अपूर्ण असल्याने उच्च न्यायालयाने टोलवसुलीस स्थगिती दिली. ‘आयआरबी’ने उच्च न्यायालयात शासनाच्या करारानुसार टोलवसुलीसाठी नि:शुल्क पोलीस बंदोबस्त पुरवावा, अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे १८ आॅक्टोबर २०१३ पासून शहरातील नऊ नाक्यांवर २४ तास पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला. एरवी खासगी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्त हवा असल्यास ‘आधी शुल्क, मग पोलीस बंदोबस्त’ असा नियम आहे. याच नियमानुसार काही व्यक्तींना किंवा कारखान्यांना, संस्थांना पोलीस बंदोबस्त पुरविला जातो. मात्र, ‘आयआरबी’ने यापूूर्वी शासनाशी केलेल्या करारामध्ये टोलवसुलीसाठी नि:शुल्क पोलीस बंदोबस्त पुरवावा, असे नमूद केल्याने न्यायालयानेही तसेच आदेश दिले. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या उरावर बसलेल्या टोलला मात्र ‘फुकट’ बंदोबस्त पुरविला गेला. २७ अधिकारी, ४५० पोलीस, असे सुमारे ४२७ पोलीस २४ तास बंदोबस्तासाठी नेमण्यात आले. त्यानुसार एका नाक्यावर तीन पोलीस निरीक्षक व ५० कर्मचारी यामध्ये भरडले गेले. शासनासह ‘आयआरबी’ने पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना नागरिकांच्या संघर्षाला तोंड देण्यास पुढे केले. एकीकडे न्यायालयाचा आदेश आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांचा रोष, या दोन्ही पेचात पोलिसांचे सॅँडविच झाले. या बंदोबस्तामुळे पोलिसांंना दिवाळीसह ईद, नाताळ, नववर्षासह संक्रांतीलाही घराकडे जाता आले नाही. अंघोळ नाही, नाष्ट्यासह जेवणाचा तर पत्ताच नव्हता. अशावेळी प्रसंगी वडापाव, ऊस खाऊन पोलिसांनी दिवस काढले. या पोलिसांच्या बंदोबस्ताच्या लाखो रुपयांच्या हिशेबाची फाईल शासनदरबारी धूळ खात पडली आहे. असे असताना आता दुसर्यांदा ‘आयआरबी’च्या टोलनाक्यांना फुकट बंदोबस्त पुरविण्यात आला आहे.