सीपीआर रक्तपेढीतून बहुतांश रुग्णांना मोफतच रक्तपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:39 AM2020-12-12T04:39:43+5:302020-12-12T04:39:43+5:30
कोल्हापूर : राज्याच्या आरोग्य विभागाने शासकीय रुग्णालयांतील रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात पूर्वीपासूनच ...
कोल्हापूर : राज्याच्या आरोग्य विभागाने शासकीय रुग्णालयांतील रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात पूर्वीपासूनच ९० टक्के रुग्णांना मोफतच रक्त दिले जाते. आता शासनाच्या आदेशानंतर उर्वरित रुग्णांनाही रक्तपुरवठा होणार आहे.
राज्यात अनेक शासकीय रुग्णालयांत रक्तावरील प्रक्रियेसाठी ८०० रुपये शुल्क आकारले जाते. त्यामुळे गरीब रुग्णांची हेळसांड होते. यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज, शनिवारी शासकीय रुग्णालयात मोफत रक्तपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात रक्ताची गरज असणाऱ्या ९० टक्के रुग्णांना मोफतच रक्तपुरवठा केला जातो. याध्ये प्रसूती, रक्तातील कॅन्सर रुग्णांना मोफतच रक्त दिले जाते. त्याशिवाय रक्तदात्यांच्या कार्डवरही मोफत रक्त दिले जाते.
‘सीपीआर’च्या रक्तपेढीत सध्या १०० रक्तपिशव्यांचा साठा आहे. सीपीआर रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू असते, त्यावेळी दिवसाला सरासरी ५० रक्तपिशव्यांची गरज असते. मात्र कोरोनामुळे रुग्ण खासगी रुग्णालयातच अधिक आहेत. त्यामुळे रक्ताची दिवसाला सरासरी ४० पिशव्यांची गरज आहे.
शिबिरे थांबल्याने रक्ताची टंचाई
कोल्हापुरात रक्तदान शिबिरे कायम सुरू असतात. यंदा कोरोनामुळे महाविद्यालये बंद आहेत. वाढदिवस, उत्सव, यात्राही बंद असल्याने शिबिरे होत नाहीत. त्याचा परिणाम रक्ताच्या उपलब्धतेवर झाला आहे. त्यामुळे काही पेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.
कोट-
‘सीपीआर’मध्ये ९० टक्के रुग्णांना मोफतच रक्तपुरवठा केला जातो. काेरोनामुळे अजून सीपीआर पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने मागणी कमी आहे. शासनाचा अध्यादेश प्राप्त होताच त्याची तातडीने अंमलबजावणी केली जाईल.
- रंजना चावरे-पाटील (तांत्रिक प्रमुख, सीपीआर ब्लड बँक)
- राजाराम लोंढे