दरमहा मोफत तपासण्या... संजीव गोखले यांचा उपक्रम...जनावरांवरील उपचारासाठी अॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:49 AM2019-03-03T00:49:22+5:302019-03-03T00:51:24+5:30
कोल्हापूर : येथील संजीव गोखले यांनी गोवर्धन व्हेटर्नरी सर्व्हिसेसच्या माध्यमातून जनावरांवर उपचार करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे; त्यासाठी अॅपची निर्मिती करून, त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत जाऊन पशुपालकाला मार्गदर्शन, जनावरांवर उपचार करणार आहेत. या अॅपची सुरुवात
राजाराम लोंढे ।
कोल्हापूर : येथील संजीव गोखले यांनी गोवर्धन व्हेटर्नरी सर्व्हिसेसच्या माध्यमातून जनावरांवर उपचार करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे; त्यासाठी अॅपची निर्मिती करून, त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत जाऊन पशुपालकाला मार्गदर्शन, जनावरांवर उपचार करणार आहेत. या अॅपची सुरुवात वैराग (जि. सोलापूर) येथून केली जाणार असून, हळूहळू राज्य व्यापण्याचा मनोदय कंपनीचा आहे.
शेतीमालाच्या अनिश्चित दरामुळे शेती आतबट्ट्यात आल्याने दुय्यम म्हणून पुढे आलेला दुग्ध व्यवसाय प्रमुख बनू लागला आहे; त्यामुळे राज्यात जनावरांची संख्या वाढत आहे; पण पशुसंवर्धनाची यंत्रणा त्या तुलनेत नाही. राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाची यंत्रणा गावपातळीवर असली तरी त्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा आहे. एका-एका पशुवैद्यकीय दवाखान्यात १0-१५ वर्षे पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नसल्याने पशुपालकांचे हाल होत आहेत.
पश्चिम महाराष्टत दूध संघांची पशुवैद्यकीय सेवा तशी चांगली आहे; पण उर्वरित महाराष्टÑात फारच बिकट अवस्था आहे. त्यामुळे हा व्यवसायही तोट्यात जात आहे. यासाठी संजीव गोखले यांनी अॅप विकसित केला आहे. यामध्ये राज्यातील पशुसंवर्धन विभागातील तज्ज्ञांची टीम केली आहे. या टीमने १२ वी पास मुलांना प्रशिक्षण दिले. ही मुले अॅपद्वारे शेतकऱ्यांची नोंदणी करणार आहेत. प्रत्येक जनावरांमागे २00 रुपये फी आकारणार आहे. ५00 जनावरांमागे एक प्रशिक्षित व्यक्ती नोंदणीकृत शेतकºयाची मागणी असो अथवा नसो, दर महिन्याला त्याच्या जनावरांच्या सर्व तपासण्या विनामूल्य करेल. थेट औषध कंपन्या जोडल्या जाणार असल्याने अल्पदरात किमान २० टक्के कमी दराने औषधेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
दुग्धविकास विभाग अनुकूल
गोखले यांनी दुग्धविकास सचिवांपुढे याचे सादरीकरण केले. दूध उत्पादकांच्यादृष्टीने खूपच नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. तीन महिन्यांतील यश पाहून सरकार आर्थिक पाठबळ देण्यास अनुकूल असल्याचे सचिवांनी सांगितले. कृत्रिम रेतन ते प्रसूतीपर्यंत उत्पादकांना सेवा दिली, तर प्रत्येक जनावरासाठी वर्षाला
६00 रुपये अनुदान देण्याची तयारी सचिवांनी दाखविली आहे.
‘पोर्टल’वर जनावरांची संपूर्ण कुंडली
जनावरांची नोंदणी केली, की त्याची पहिल्या दिवसापासून तपासण्या व उपचार कायकेले, याची संपूर्ण माहिती पोर्टलवर एकत्रित होणार आहे. शेतकºयाने जनावरांची विक्री केली, तर नवीन पशुपालकाला संबंधित जनावरांचा क्रमांक पोर्टलवर टाकल्यास संपूर्ण कुंडलीच मिळणार आहे.
रक्त, लघवीच्या १४ तपासण्या !
माणूस आजारी पडला की, प्रथम त्याच्या रक्त, लघवीच्या तपासण्या केल्या जातात. त्याप्रमाणे जनावरांच्या दर महिन्याला रक्त, लघवीच्या विविध प्रकारच्या १४ तपासण्या केल्या जाणार आहेत.
या देणार सुविधा
कृत्रिम रेतन ते प्रसूती पर्यंत मार्गदर्शन व उपचार
नाक, कान, घशाची इंडोस्कोपी
रक्त, लघवीच्या १४ तपासण्या करणार
वैरण, पशुखाद्य वापरण्याबाबत मार्गदर्शन
सवलतीच्या दरात औषधे
दूध उत्पादकांसमोर भाकडकाळ ही मोठी समस्या असून, त्यासह जनावरांच्या इतर आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे अॅप तयार केले. उत्पादकाला अत्यल्प पैशात गोठ्यात आधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न
आहे. - संजीव गोखले