रिक्त संचालक पदे भरण्याचा सहकारी संस्थांचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:36 PM2018-10-28T23:36:56+5:302018-10-28T23:37:14+5:30
राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील सहकारी संस्थांची रिक्त पदे भरण्याबाबत निवडणूक प्राधिकरणाने स्पष्ट आदेश काढले ...
राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यातील सहकारी संस्थांची रिक्त पदे भरण्याबाबत निवडणूक प्राधिकरणाने स्पष्ट आदेश काढले आहेत. ज्या संस्थांची निवडणूक होऊन अडीच वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त कालावधी झाला असेल, तर त्यांना रिक्त पदे भरण्याची मुभा संचालक मंडळाला दिली
आहे. त्यासाठी निबंधकांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया राबवावी लागणार आहे. निवडणुकीपासून अडीच वर्षांच्या आत पद रिक्त झाले असेल तर तिथे थेट निवडणूकच घ्यावी लागणार आहे.
सहकारी संस्थांच्या निवडणूक नंतर संचालक मंडळातील एखादे पद काही कारणांनी रिक्त झाले तर त्या जागेसाठी वर्षा-दीड वर्षात निवडणूक लावणे संस्थांना आर्थिकदृष्ट्या न परवडणारे होते. त्यामुळे अनेक संस्थांत पदे रिक्तच ठेवली जायची अथवा स्वीकृत करून घेतले जायचे. मग ही नियुक्ती अधिकृत की अनधिकृत हा वाद न्यायालयात जायचा. याबाबत निवडणूक प्राधिकरणाने स्पष्टता देणारे परिपत्रक २६ आॅक्टोबर रोजी जारी केले आहे.
तीन संस्थांतील
पदे भरण्याचा मार्ग मोकळा
कोल्हापूर जिल्हा बॅँक, कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) व शेतकरी संघ या संस्थांच्या निवडणुका होऊन अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाल्याने स्वीकृत म्हणून पदे भरण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
नोटीस देऊन अर्ज मागवावे लागणार
रिक्त पदासाठी संस्था व निबंधक कार्यालयाच्या नोटीस फलकावर जाहीर करून अर्ज मागवावे लागणार आहेत. या नोटिसीचा पंचनामा करण्याबरोबरच अर्ज सादर करण्यासाठी सात ते पंधरा दिवसांचा कालावधी देणे संस्थांना बंधनकारक राहणार आहे.
दोनच पदे स्वीकृतीने भरता येणार
रिक्त पदे स्वीकृत पद्धतीने भरण्यासाठी संस्था संचालकांच्या कालावधीत दोनपेक्षा अधिक पदे भरता येणार नाहीत. दोन भरल्यानंतर आणखी एखादे रिक्त राहत असेल तर ते पद निवडणुकीद्वारे भरावे लागेल. त्यासाठी प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर करायचा आहे.