२५ लाख लाेकांना आणखी एक महिना मोफत धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:24 AM2021-04-25T04:24:28+5:302021-04-25T04:24:28+5:30
कोल्हापूर : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात गरीब कुटुंबांना उदरनिर्वाहाचा प्रश्न येऊ नये यासाठी केंद्र शासनाने दोन महिने रेशनवरील ...
कोल्हापूर : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात गरीब कुटुंबांना उदरनिर्वाहाचा प्रश्न येऊ नये यासाठी केंद्र शासनाने दोन महिने रेशनवरील धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ जिल्ह्यातील २५ लाखांहून अधिक नागरिकांना होणार आहे. राज्य शासनाने आधीच एक महिना धान्य मोफत देण्याचे जाहीर केले आहे. त्यात आणखी एका महिन्याने वाढ झाली असून मे आणि जूनमध्ये त्याचे वितरण होईल.
सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असून राज्य शासनाने आधी संचारबंदी आणि आता कडक लॉकडाऊन सुरू केले आहे. या काळात रोजगार नसल्याने नागरिकांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्यांना उपाशी राहायला लागू नये यासाठी शिवभोजन थाळी मोफत केली आहे तसेच रेशनवरील धान्य एक महिना मोफत देण्याचे जाहीर केले आहे. एप्रिलमधील धान्याचे वितरण त्याआधीच झाले आहे. त्यामुळे मे महिन्याचे धान्य मोफत दिले जाईल. दरम्यान, केंद्र शासनाने शुक्रवारी दोन महिने मोफत धान्य देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नागरिकांना मे आणि जून असे दोन महिने तांदूळ आणि गहू मोफत मिळणार आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील पिवळे अंत्योदय व प्राधान्यक्रम अशा दोन प्रकारच्या शिधापत्रिकाधारक नागरिकांना होणार आहे.
--